आयसीएसई बोर्डाच्या दहावी, बारावी परीक्षा पुढे ढकलल्या

करोना विषाणूच्या देशातील फैलावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आयसीएसई बोर्डाने दहावी आणि बारावी परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. आयसीएसई दहावीची परीक्षा ३० मार्चला तर बारावीची परीक्षा ३१ मार्चला संपणार होती. मात्र आता १९ ते ३१ मार्च या कालावधीतले पेपर लांबणीवर पडले आहेत.

परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. आयसीएसई बोर्डाच्या सर्व शाळांनी विद्यार्थी – पालकांनी ही माहिती सूचित करावी असे आवाहन बोर्डाने केले आहे. बोर्डाचे मुख्य कार्यकारी आणि सचिव गेरी अराथून यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. एमएचआरडी, सीबीएसई आणि नॅशनल टेस्ट एजन्सीने सर्व परीक्षा ३१ मार्च पर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय बुधवारी १८ मार्च रोजी घेतला. या पार्श्वभूमीवर आयसीएसई बोर्डाने हा निर्णय घेतला.

दरम्यान, ज्या विषयांच्या परीक्षा झालेल्या आहेत, त्यांची पेपर तपासणी शिक्षक घरातूनच करणार आहेत. यंदा आयसीएसई बोर्डाने पेपर तपासणीचे केंद्रीभूत म्हणजेच सेंट्रलाइज्ड धोरण बदलून ही प्रक्रिया विकेंद्रित केली आहे. यासंदर्भातील सूचनीही अराथून यांनी बुधवारी १८ मार्च रोजी दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *