शेेतकरी कर्जमुक्ती योजनेतील 9035 कोटी रक्कम जमा

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी प्रसिध्द केल्यानंतर अवघ्या 5 दिवसात 15 लाख 45 हजार शेतकर्‍यांचे प्रमाणिकरण पूर्ण झाले आहे.  यापैकी 13 लाख 88 हजार कर्जखात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम शासनाकडून जमा करण्यात आली असून ती सुमारे रुपये 9035 कोटी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांना याबाबतीत कुठलीही अडचण येऊ नये व त्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना सहकार विभागास दिल्या आहेत

योजनेच्या अंमलबजावणीमध्ये योजनेअंतर्गत अतिशय पारदर्शक पध्दतीने शेतकर्‍यांची गावनिहाय यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.  यामुळे शेतकर्‍यांना आपल्या नावाचा समावेश यादीमध्ये असल्याबाबतची खात्री पटली.  सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने यादी प्रसिध्दीकरण आणि आधार प्रमाणिकरण विनाखंड व विनातक्रार पार पाडण्यासाठी पूर्व नियोजन केले आहे. ही कार्यवाही राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये  मोहिम स्वरुपात राबविण्यात येत आहे अशी माहिती सहकार प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी दिली.

प्रत्येक जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्रावर व बँकांच्या शाखांमध्ये येणार्‍या शेतकर्‍यांचे प्रमाणिकरण अवघ्या दोन ते तीन मिनिटांत होत असल्यामुळे सर्व ठिकाणी शेतकरी बांधवांमध्ये उत्साह व समाधान व्यक्त होत आहे.

प्रसिध्द केलेल्या यादीतील शेतकर्‍यांनी आधार प्रमाणिकरण केल्यानंतर, त्यांनी यादीत नमूद असलेल्या कर्जखात्याची रक्कम मान्य किंवा अमान्य अशा दोन्ही परिस्थितीमध्ये  संगणकीय पावती देण्यात येते. यावरुन योजनेची अंमलबजावणी पूर्णत: पारदर्शकपणे व लोकाभिमुख पध्दतीने राबविण्यात येत असल्याबाबतची काळजी घेण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *