मुंबई आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, तसंच मुंबई प्रवेशद्वारावरील टोल वसुली बंद करण्यात येणार नसल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी एका लेखी उत्तराद्वारे याबाबत माहिती दिली.
काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ यांनी टोलमाफी संदर्भातील तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या प्रश्नाला एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तराद्वारे माहिती दिली. मुंबई प्रवेशद्वारासह मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर टोल वसुली बंद करणं शक्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुंबई प्रवेशद्वारासह मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर हलक्या वाहनांना सुट देण्याबाबत आर्थिक स्थिती तपासण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती.
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीनं दिलेल्या अहवालानुसार टोलमाफी देणं शक्य नसल्याचं शिंदे यांनी उत्तरात म्हटलं आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारांवर तसंच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर हलकी वाहनं आणि एसटीला सुट दिल्यास ६ हजार ८५३ कोटी रूपये एकरकमी द्यावे लागणार आहे. तर पाच टप्प्यात ही रक्कम द्यायची झाल्यास ९ हडार ४६३ कोटी रूपये द्यावे लागणार आहे. तर पूर्णत: हे टोलनाके बंद केल्यास १३ हजार ३७९ कोटी रूपये एकरकमी द्यावे लागणार आहेत. तर पाच टप्प्यांमध्ये ही रक्कम द्यायची झाल्यास १८ हजार ४६३ कोटी रूपयांची नुकसान भरपाई द्यावी लागणार असल्याचं समितीनं आपल्या अहवालात नमूद केलं आहे. नुकसान भरपाईची रक्कम ही मोठी असल्यानं टोल वसुली बंद करणं शक्य नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
