दाभोलकर हत्या: अरबी समुद्राच्या तळातून शोधलं पिस्तूल, सीबीआयच्या हाती मोठं यश

अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयला मोठं यश मिळालं आहे. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेलं पिस्तूल सीबीआयच्या हाती लागलं आहे. अरबी समुद्राच्या तळातून हे पिस्तूल सीबीआयने शोधून काढलं आहे. नॉर्वेमधील पाणबुडे आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे पिस्तूल सीबीआयने शोधून काढलं. तपासाशी संबंधित दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. २०१३ रोजी नरेंद्र दाभोलकर यांची दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी गोळी घालून हत्या केली होती.

हे पिस्तूल दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरले होते का ? याचा तपास सध्या सीबीआय करत असून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. सीबीआयने २०१९ रोजी पुणे कोर्टात ठाण्यामधील खारेगाव खाडीत हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राचा शोध घ्यायचा असल्याचं सांगितलं होतं. “अनेक दिवस शोध घेतल्यानंतर आम्हाला पिस्तूल सापडलं आहे. शवविच्छेदन अहवालात असलेल्या माहितीच्या आधारे बॅलिस्टिक तज्ञ पिस्तुलाची पाहणी करणार आहेत,” अशी माहिती एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *