दोन हजार रुपयांच्या चलनी नोटा अर्ध्या किमतीत देण्याचे आमीष दाखवून देशभरात गंडा घालणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने बेडय़ा ठोकल्या. या टोळीने मुंबईत मोबाइल विकणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्याचे ८० लाख रुपये घेऊन पोबारा केला होता.
उत्तर प्रदेशात राहणारा आनंदकुमार तिवारी ऊर्फ अतुल हा या टोळीचा प्रमुख आहे. त्याने कोलकाता, उत्तर प्रदेश, दिल्ली, महाराष्ट्रात अनेक व्यापारी, व्यावसायिकांना निम्म्या किमतीत चलनी नोटा विकण्याचे आमीष दाखवत फसवल्याची माहिती गुन्हे शाखेला प्राथमिक चौकशीतून मिळाली.
केंद्र सरकारने सेंकड सीरिजच्या नोटा म्हणजे एकाच क्रमांकाच्या दोन नोटा छापल्या आहेत. त्यातील एका क्रमांकाच्या नोटांचा साठा चलनात आहे. मात्र त्याच क्रमांकाच्या नोटांचा साठा आपल्या ताब्यात आहे, तो चलनात आणण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, अशी थाप तिवारी आणि त्याचे सहकारी मारत. दोन हजार रुपयांचे मूल्य असलेल्या हव्या तितक्या नोटा उपलब्ध करून देऊ शकू, मात्र त्यासाठी अर्धी किंमत (५०० व १०० मूल्य असलेल्या नोटा) द्याव्या लागतील, असे सांगत. मुंबईत मोबाइल विक्रीचा व्यवसाय करणारा व्यावसायिक या टोळीच्या संपर्कात आला. आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील एका प्रसिद्ध, तारांकित हॉटेलमध्ये टोळीने या व्यावसायिकाची भेट घेतली. टोळीचा म्होरक्या तिवारी याने व्यावसायिकाला स्वत:कडील दोन हजार मूल्य असलेल्या पाच नोटा दिल्या. या नोटा ‘सेकंड सीरिज’च्या आहेत, या नोटा कोणालाही संशय न येता सहज चालनात येतील, हवे तर खातरजमा करून पाहा, असे सुचवले. व्यावसायिकानेही त्या सहजरीत्या वठवल्या.
तिवारीवर विश्वास बसल्याने व्यावसायिकाने सेकंड सीरिजच्या, दोन हजार रुपये मूल्य असलेल्या आठ हजार नोटांची (एक कोटी ६० लाख रुपयांची) मागणी केली. या नोटा विकत घेण्यासाठी व्यावसायिकाने ८० लाख रुपये गोळा केले. व्यवहार सुरू झाला आणि तितक्यात तिवारी व त्याच्या साथीदारांनी एटीएसचा छापा पडला, असा कांगावा करत घाईघाईत व्यावसायिकाच्या हाती नोटांची बंडले दिली आणि तेथून पळ काढला. व्यावसायिकाने बंडले तपासली तेव्हा त्यात वरची आणि तळाची नोट वगळता उर्वरित कोरे कागद होते.
ही टोळी गोरेगाव येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दडल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सातरस्ता कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय निकुंबे यांना मिळाली. त्यानुसार सहायक निरीक्षक संतोष साळुंखे, गणेश केकाण, उपनिरीक्षक अतीश लोहकरे, अंमलदार हृदयनाथ मिश्रा आणि पथकाने तिवारीसह त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले. या टोळीने आतापर्यंत अनेकांची अशी फसवणूक केल्याचे चौकशीत समोर आले आहे. पंचतारांकित हॉटेलमधील वास्तव्य, उंची कपडे, ब्रॅण्डेड घडय़ाळे, उच्चभ्रू वलयात ऊठ-बस असल्याचा आभास आणि छातीठोकपणे थाप मारण्याचे कसब या जोरावर तिवारीने अनेक व्यावसायिकांना विश्वासात घेत लुटले, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपआयुक्त शहाजी उमाप यांनी दिली.
