जम्मू-काश्मीरमधील आरोग्य विभागाच्या पुढाकारानंतर आठ राज्यांमधून खोकल्याच्या विषारी औषधाच्या पाच हजार बॉटल्स परत मागवण्यात आल्या आहेत. येथील उधमपूरमध्ये हे विषारी औषध पिल्याने ९ मुलांचा मत्यू झाला तर सहा जण आजारी पडले होते. या घातक औषधाचा पुरवठा देशभरातील आठ राज्यांमध्ये झाल्याचे समजल्यावर आरोग्य विभागाचे धाबे दणाणले होते. यानंतर तातडीने या औषधाचा पुरवठा बंद करून, सर्व राज्यांमधून हे घातक औषध परत मागवण्याचे आदेश देण्यात आले. या घातक औषधाचे नाव ‘कोल्डबेस्ट-पीसी’ आहे, जे घेतल्यामुळे मागील महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये मुलांचा मृत्यू झाला होता.
ज्या राज्यांमधून हे औषध परत मागवण्यात आले आहे, त्या राज्यांमध्ये हिमाचल प्रदेशसह जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश, त्रिपूरा, मेघालय आणि तामिळनाडू यांचा समावेश आहे.
या औषधामध्ये विषारी घटकांचा समावेश असल्याचे तपासणीत समोर आलं आहे. हिमाचल प्रदेशमधील मौजूद डिजिटल व्हिजन फार्मास्यूटिकलने हे तयार केले होते. या कंपनीचा परवाना रद्द करण्यात आलेला आहे.
या औषधाचा पुरवठा हिमाचल प्रदेश व अन्य सात राज्यांमध्ये करण्यात आला होता. प्राथमिक तपासात ही बाब निदर्शनास आली की या औषधामध्ये विषारी घटकांचा समावेश होता. ज्यामुळे ते घेतल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील नऊ मुलांचा मृत्यू झाला. या ‘कोल्डबेस्ट-पीसी’ औषधात विषारी ‘डायइथिलीन ग्लायकोल’ चा समावेश होता. ही माहिती जम्मू-काश्मीरमधील ड्रग अँड फूड कंट्रोल ऑर्गनायझेशनचे सहाय्यक ड्रग्स नियंत्रक सुरिंदर मोहन यांनी दिली आहे.
