काश्मीर व पंजाबमध्ये दहशतवाद्यांचा खतपाणी घालणारा आणि अफगाणिस्तानात तालिबानचा भस्मासूर उभा करणारा आयएसआयचा माजी प्रमुख हमीद गुलचे येथे निधन झाले. तो ७८ वर्षाचा होता.
शनिवारी रात्री मेंदूतील रक्तस्रव झाल्याने त्याला तातडीने मुरे येथील कम्बाईन लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे पोहचताच त्याला मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती त्याची मुलगी उज्मा गुल हिने सांगितले.
कट्टर मुस्लिम विचारांचा असलेल्या गुलने १९८० ते ९० च्या दशकात काश्मीर व पंजाबमध्ये दहशतवाद पसरवण्यात मोठे खतपाणी घातले. १९५८ मध्ये लष्करात दाखल झालेला गुल १९६५ मध्ये रणगाडा दलाचा कमांडर बनला. १९७८ मध्ये त्याला ब्रिगेडियर म्हणून प्रमोशन मिळाले. त्यानंतर १९८७ मध्ये तो आयएसआयचा प्रमुख बनला.
काश्मीर व अफगाणिस्तानात दहशतवाद पसरवण्यात गुलचा मोठा वाटा होता. अनेक दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांबरोबर तो कार्यक्रमातही सहभागी होत होता. अमेरिका व भारताविरोधात त्याने नेहमीच गरळ ओकली.

