बाबासाहेब पुरंदरेंना पुरस्कार देऊ नका- भालचंद्र नेमाडे

बाबासाहेब पुरंदरेंना पुरस्कार देऊ नका-  भालचंद्र नेमाडे

शिवशहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेला इतिहास वस्तुनिष्ट नाही. त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अनेक काल्पनिक आणि खोटय़ा गोष्टीही घुसवल्या आहेत. त्यामुळे पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ देऊ नये, असे मत ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे आणि ज्येष्ठ लेखक डॉ. नागनाथ कोत्तापले यांनी व्यक्त केले. याबाबत त्यांच्यासह इतर साहित्यिकांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनही दिले आहे. यामुळे बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कारा’ला विरोध करणा-यांची यादी वाढतच चालली आहे.

डॉ. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांचे केलेले चित्रण इतिहासाला धरून नाही. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येऊ नये. बाबासाहेबांच्या निष्ठेविषयी मला अजिबात शंका नाही. त्यांच्याविषयी नितांत आदर आहे, पण शिवाजी महाराजांबद्दलची आमच्या मनात असलेली प्रतिमा वेगळी आहे. बाबासाहेबांचे शिवरायांविषयीचे लेखन आमच्या आकलनात बसत नाही, अशा शब्दांत नेमाडे यांनी पुरंदरे यांच्या पुरस्काराला विरोध केला.

नेमाडे यांच्याबरोबच साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास विरोध दर्शवला आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर भालचंद्र नेमाडे यांच्यासह डॉ. नागनाथ कोतापल्ले, मुक्ता दाभोलकर, मेघा पानसरे, विद्या बाळ यांच्या स्वाक्ष-या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *