दोघा बहिणींना प्रवासी म्हणून जीप गाडीत बसवून लूटमारीच्या हेतूने दोरीने गळा आवळून एकीचा खून केला आणि दुसरीच्या खुनाचा प्रयत्न केला. नंतर त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने व मोबाईलसंच असा ऐवज लुटल्याबद्दल बाप व दोन मुलांसह चौघा आरोपींना दोषी धरून सोलापूरच्या सत्र न्यायालयाने जन्मठेपेसह प्रत्येकी ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या खटल्याची न्यायालयात यापूर्वी सुनावणी सुरू असता न्यायाधिशांवरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.
भीमराव देवराव राठोड (वय ४२), राहुल भीमराव राठोड (वय २१) व रोशन भीमराव राठोड (वय १९) या बाप-मुलांसह राजू महादेव चव्हाण (वय १९, चौघे रा. शिवाजी नगर तांडा, अक्कलकोट) अशी या खटल्यात शिक्षा ठोठावण्यात आलेल्या चौघा आरोपींची नावे आहेत. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. जी. मोहिते यांनी या खटल्याचा निकाल सुनावला. या खटल्याची पाश्र्वभूमी अशी की, सुनंदा शंकर घोडके (वय ३६) व त्यांच्या भगिनी रेश्मा दादासाहेब पळसे (वय ३२, रा. तरटगाव, ता. पंढरपूर) या दोघी सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावर कामती (ता. मोहोळ) येथे आल्या होत्या. ३ मे २०१५ रोजी दुपारी तेथून गावाकडे परत जाण्यासाठी बस थांब्याच्या दिशेने पायी चालत निघाल्या असताना त्यांनी चाललेल्या एका क्रूझर जीप गाडीला विनंती करून थांबविले. पंढरपूरच्या दिशेने जाण्यासाठी जीपमध्ये बसून सुनंदा व रेश्मा या दोघी बहिणी निघाल्या असता पुढे मंगळवेढय़ाकडील रस्त्यावर आल्यानंतर काही अंतरावर जीपमधील चौघांनी अचानकपणे सुनंदा घोडके यांचा गळा दोरीने आवळला. त्या बेशुध्द पडल्यानंतर त्याच दोरीने रेश्मा पळसे यांचाही गळा आवळला. तीदेखील बेशुध्द पडल्यानंतर क्रूझर जीपमधील त्या चौघा नराधमांनी त्या दोघींच्या अंगावरील सोन्याचे दागिने व मोबाईल संच काढून घेतले. नंतर त्या दोघींना बेशुध्दावस्थेत कोरवली येथे माळरानावर टाकून दिले. यात सुनदा घोडके यांचा मृत्यू झाला. तर रेश्मा पळसे गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्या फिर्यादीनुसार कामती पोलीस ठाण्यात संबंधितांविरूध्द गुन्हा दाखल झाला होता.
या खटल्याची सुनावणी सोलापूरच्या सत्र न्यायालयात सुरू झाली असताना यातील आरोपींनी भर न्यायालयात न्यायाधिशांवरच थेट हल्ला केला होता. वकिलांनाही न्यायालयात खटला चालविताना धमकावले होते. त्यामुळे न्यायालयानेही या आरोपींविरूध्द प्राणघातक हल्ल्याप्रकरणी स्वतंत्र खटला दाखल केला होता. आरोपींनी न्यायालयात खटला सुरू असताना सुरुवातीपासून अडथळे आणले होते. हा खटला इतर न्यायालयात वर्ग करण्यासाठी अर्ज दाखल केला असता मुंबई उच्च न्यायालयाने विश्वासार्हता दर्शवित आहे. त्याच न्यायालयात खटला चालविण्याचे आदेश दिले होते. तर आरोपींनी त्यांच्या वकिलांना धमकावल्यामुळे त्या वकिलाने वकीलपत्र काढून घेतले होते. त्यानंतर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून आरोपीसाठी स्वतंत्रपणे अॅड. राजेंद्रसिंह बायस याची नेमणूक करण्यात आली होती. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी १५ साक्षीदार तपासले. यात फिर्यादी रेश्मा पळसे यांच्यासह अन्य नेत्रसाक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, पोलीस तपास अधिकारी, एस. डी. झाडे आदींची साक्ष महत्त्वाची ठरली.
