किनवट वनविभागाच्या हद्दीतील नियतक्षेत्र घोटी शिवारातील रेल्वे रुळावर रेल्वे इंजीनच्या धडकेने एका मादी अस्वलाचा मृत्यू झाला. सातत्याने अस्वलांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सदर घटना मंगळवारी (दि.04) पहाटे घडली असावी, असा वनविभागाचा अनुमान आहे.
घोटी शिवारातील अशोक राजुलवार यांच्या शेताजवळील रेल्वे पटरीशेजारी एका मादी जातीच्या अस्वलाचा मृतदेह पडून असल्याची खबर मंगळवारी सकाळी साडेसातच्या दरम्यान किनवट वनविभागाला मिळाली. त्यानंतर वनक्षेत्रपाल के.एन.खंदारे यांनी वनपाल के.जी.गायकवाड, वनरक्षक एस.डी.खामकर, संभाजी घोरबांड, एन.के.चुक्कलवार, वाहनचालक आवळे यांना सोबत घेऊन घटनास्थळी गाठले.
दरम्यान किनवटचे पशुधन विकास अधिकारी डॉ.व्ही.एन.बिराजदार यांना पाचारण करण्यात आले. डॉ.बिराजदार सह डॉ.अश्विन जयराजन व डॉ.शिवनकर यांनी संयुक्तरित्या त्या अस्वलाचे शवविच्छेदन करुन शव वनविभागाच्या स्वाधीन केल्यानंतर त्या मृतदेहास राजगड आगारात नेऊन तिथे अग्निसंस्कार करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे नेमके कोणत्या रेल्वेने हा अपघात झाला याबद्दल वनविभाग सुद्धा अनभिज्ञच दिसून आला. कारण त्यांना माहिती विचारली असता ते माहिती देऊ शकले माहीत.
उत्तरीय तपासणी केलेल्या डॉ.बिराजदार यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मादी अस्वल आठ वर्षीय असून अंधारात पाठीमागून रेल्वेची जबर धडक बसल्याने ती जवळपास पस्तीस फूट लांब जाऊन आदळली. तिच्या शरीरांतर्गत प्रचंड रक्तस्त्राव झालेला होता. शिवाय मागचा डावा पाय सुद्धा धडकेत मोडला गेला अन् शवविच्छेदनात यकृतसुद्धा निकामी झाल्याचे समजले. वन्यप्राण्यांचे मानवी वस्तीकडे येणे वाढले असून अनेक शेतकर्यांवर अस्वलाचे हल्ले गेल्या काही महिन्यात झालेले आहेत. ते पाण्याच्या शोधात येत असतील तर, त्यांच्यासाठी जंगलात तयार केलेल्या पाणवठ्यात जलसाठ्याची सोय वनविभागाने केली नाही काय? आदी प्रश्नांविषयी वन्यप्रेमींत चर्चा होत आहे.
