मार्चमध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होणार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द मी शेतकऱ्यांना दिला असून दिलेल्या शब्दाप्रमाणे येत्या मार्च महिन्यापासून ही योजना सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. दोन लाखांपर्यंत ज्यांचं पीक कर्ज आहे, ते पूणपणे माफ होणार असून त्याच्या सातबारावरून ही पीककर्ज काढून टाकलं जाणार आहे, असंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. दोन लाखांपेक्षा वर असलेल्या कर्जदारांसाठी आणि विशेषत: जे नियमित कर्ज फेडत आहेत अशांसाठी लवकरच योजना जाहीर करून ती अंमलात आणली जाईल अशी घोषणाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्राचे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या दीर्घ मुलाखतीच्या दुसऱ्या भागात मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, या योजना कार्यान्वित करत असताना राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊनच या योजना तयार करण्यात येणार आहेत. मला करायची असेल तर आताही ती घोषणा मी करू शकतो. असं नाही की योजना तयार नाहीये. योजना तयार केल्यानंतर ती अमलात आणण्याची तयारी झाल्यानंतर ती अमलात आणावी लागते.

कर्जमाफी हा प्रथमोपचार असल्याचे या वेळी मुख्यमंत्री म्हणाले. शेतकरी त्याच्या पायावर कसा उभा राहील यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे. त्यासाठी शेतीसाठी नवे प्रयोग कसे करता येतील, कमी जागेत जास्त पीक कसं घेता येईल, ते पीक आल्यानंतर त्याला योग्य दाम किंवा योग्य भाव कसा मिळवून दिला जाईल, त्याचं मार्केटिंग कसं केलं जाईल अशी संपूर्ण चेन असायला हवी. याची अखणी करण्याची आवश्यकता असून त्याबद्दल सुद्धा निर्णय घेतले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *