झारखंडमध्ये प्रवासी व्हॅनला भरधाव ट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात ११ भाविकांचा मृत्यू झाला तर ११ जण जखमी झाले आहे. मृतांमध्ये सहा महिलांचा समावेश आहे.
सेरायकेला-खरसवान जिल्ह्यातील चौका येथे शुक्रवारी सकाळी हा भीषण अपघात घडला. पुरीहून भाविकांना घेऊन जाणा-या प्रवासी व्हॅनला भरधाव ट्रकची जोरदार धडक बसली.
ही धडक इतकी भीषण होती की गाडीतील ११ भाविक जागीच ठार झाले तर ११ जण जखमी झाले. पुरी येथे दर्शनासाठी गेलेले भाविक घरी परतत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला.
अपघातातील जखमी नागरिकांना एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण बिहारच्या सिवानमधील आँद्र बाजार येथील रहिवासी होती.
