ग्रंथ दिंडीनं ९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला सुरूवात

उस्मानाबादमध्ये होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची सुरूवात ग्रंथ दिंडीनं करण्यात आली. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा अरूणा ढेरे, विक्रम काळे आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ढाले-पाटील यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचं पूजन करण्यात आलं. ग्रंथ दिंडीला साहित्य प्रेमींनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. तर लहान मुलामुलींनी लेझीम आणि संगीताच्या तालावर ठेका धरल्याचंही पहायला मिळालं.

आजपासून तीन दिवस हे संमेलन पार पडणार आहे. या संमेलनाला देशभरातील मराठी साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. आज (शुक्रवार) सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडीपासून या संमेलनाची सुरुवात झाली. तर संध्याकाळी ४ वाजता संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, संमेलानाचे अध्यक्ष फादर दिब्रिटो यांच्या प्रकृतीतही सुधारणा झाल्याची माहिती समोर आली आहे. संध्याकाळी पार पडणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला ते उपस्थित राहणार असून अध्यक्षीय भाषणही करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर हे संमेलनाचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांना संमेलनाला उपस्थित न राहण्यासाठी धमकीचा फोन आला होता. परंतु आपण कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचं महानोर यांनी सांगितलं. दरम्यान, धमकीनंतर फादर दिब्रिटो आणि महानोर यांच्या सुरक्षेतही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *