सेप्टिक टँकमध्ये तीन कामगारांचा मृत्यू

साफसफाई करण्यासाठी सेप्टिक टँकमध्ये उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी गोवंडीच्या गणेशवाडी परिसरात घडली. विश्वजीत देबनाथ (३२), संतोष कळशेकर (५४) आणि गोविंद संग्राम चोरटीया (३४) अशी मृत कामगारांची नावे असून याप्रकरणी गोवंडी पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गोवंडी पोलिस ठाण्याच्या बाजूला झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत बांधण्यात आलेल्या मोरया को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये असलेली गटारे तसेच सेप्टिक टँक साफ करण्याचे काम सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी खासगी कामगार विश्वजीत देबनाथ याला दिले होते. दोन दिवसांपासून विश्वजीत सोसायटीच्या आवारात येऊन गटार साफसफाईचे काम करीत होता. काम जास्त असल्याने आणि सेप्टिक टँकमध्ये उतरून सफाई करायची असल्याने विश्वजित याने संतोष आणि गोविंद या दोघांना सोबत घेतले. हे तिघेही नाका कामगार सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सोसायटीमध्ये पोहोचले. अकराच्या सुमारास कामाला सुरुवात केल्यानंतर सर्वात आधी विश्वजीत सेप्टिक टँकमध्ये उतरला. बराच उशीर तो बाहेर न आल्याने संतोष खाली उतरला. संतोष देखील बराच वेळ बाहेर न आल्याने गोविंदने बाहेरून दोघांनाही वारंवार आवाज दिला. मात्र दोघांचा काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना पाहण्यासाठी गोविंदही सेप्टिक टँकमध्ये उतरला. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने तिन्ही कामगार कुठेच दिसत नसल्याचे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. पदाधिकाऱ्यांनी गोवंडी पोलिसांना कळविल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन जवानांनी बेशुद्धावस्थेतील तिन्ही कामगारांना बाहेर काढल्यानंतर त्यांना शताब्दी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *