आमदार निवासात मद्यपींचा धुमाकूळ

आमदारांचे निवासस्थान म्हणजे सुरक्षेचा चोख बंदोबस्त व कसलीच गैरसोय नाही असाच सर्वसामान्यांचा समज असतो. मात्र बुधवारी महिलांसाठीच्या व पुरुषांसाठीच्या अशा दोन्ही आमदार निवासात मद्यपी धुमाकूळ घालत असल्याचा प्रकार समोर आला. दोन्ही प्रकारांची चौकशी करून कारवाईचा आदेश विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आमदार निवासातील सुरक्षेचा प्रश्न मांडला. मंगळवारी मध्यरात्रीनंतर तीन-चार लोकांनी आमदार निवासातील माझ्या खोलीचे दार जोरात ठोठावले व दार उघडेपर्यंत गोंधळ घातला. आम्हाला दारू पिण्यासाठी आणखी पैसे हवे होते. आमच्याकडे पैसे नाहीत. तुम्ही आमदार आहात. आम्हाला पैसे द्या नाही तर बघून घेऊ, अशी धमकी या मंडळींनी दिली. मी या लोकांना रागावून हाकलून लावले. पण त्या वेळी आसपास सुरक्षा व्यवस्थेतील एकही पोलीस नव्हता. आमदार निवासात असे कोणीही शिरत असेल तर आमदारांची सुरक्षा धोक्यात आहे हे लक्षात घ्यायला हवे. पोलिसांशी नंतर संपर्क साधल्यावर ते पोलीस ठाण्यात येऊन तक्रार द्या, असे सांगत होते, अशी तक्रार कल्याणशेट्टी यांनी केली.

त्यानंतर भाजपच्या महिला आमदार मंदा म्हात्रे यांनीही महिलांसाठीच्या आमदार निवासाच्या खोल्यांजवळ रात्री कोणी तरी येऊन मद्याच्या बाटल्यांचा ढीग टाकून गेल्याची तक्रार सभागृहात केली. बहुतांश महिला आमदार हॉटेलवर राहत असल्याने आम्ही दोघी-तिघीच आमदार निवासात राहतो. या प्रकारामुळे आमदार निवासात सुरक्षा व्यवस्था चोख नसल्याचे सिद्ध होत असल्याची टीका म्हात्रे यांनी केली. या दोन्ही तक्रारींची गंभीर दखल घेत त्यावर कारवाई करण्याचे निर्देश पटोले यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *