उच्चशिक्षित असलेल्या ‘त्याने’ एका विवाहेच्छुक शेतकरी तरुणाची संकेतस्थळावर ‘ती’ बनून फसवणूक केली, मात्र नगरच्या सायबर पोलिसांनी ‘त्याची’ बनवेगिरी अखेर उघड केली व त्याला मुंबईतून जेरबंद केले. निखिल नीलेश कदम (२६, रा. दत्तु कदम चाळ, रायडोंगरी, बोरवली, मुंबई) असे ‘ती’ बनून फसवणूक करणाऱ्या ‘त्याचे’ नाव आहे. नगरच्या न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. अटक केलेला निखिल कदम हा बीई सिव्हिल आहे. परंतु आपल्या उच्चशिक्षणाचा मोबाईल व फोटोशॉप तंत्रज्ञानातील ज्ञानाचा वापर त्याने फसवणूक करण्यासाठी केला. अशाच प्रकारे त्याने आणखी काही गुन्हे केल्याचा पोलिसांना संशय आहे.
जामखेड तालुक्यातील सारोळा येथील हनुमंत मोहनराव काळे याने विवाहासाठी ‘जीवनसाथी’ या संकेतस्थळावर नावनोंदणी केली होती. संकेतस्थळावर त्याचा रेखा नीलेश कदम (रा. वाशी, नवी मुंबई) या तरुणीशी संपर्क झाला. दि. १६ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत संकेतस्थळ व व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून ते संपर्कात होते. आपण जाहिरात व शॉर्टफिल्म तयार करण्याच्या क्षेत्रात काम करत असल्याची ओळख तिने सांगितली होती. या कालावधीत एकदा आपण दुबईत असून आपल्याकडील पैसे संपले आहेत, असे कारण देऊन हनुमंत याच्याकडुन दोन हजार रुपये मागवून घेतले. नंतर वेळोवेळी एकूण १ लाख ६५ हजार रुपये घेतले. मात्र प्रत्यक्ष संपर्क टाळला होता. त्यामुळे ‘ती’ कडून फसवणूक झाल्याने काळे यांनी नगरच्या सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण परदेशी, उपनिरीक्षक प्रतीक कोळी, हवालदार योगेश गोसावी, उमेश खेडकर, दिगंबर कारखेले, मल्लिाकार्जुन बनकर, स्मिता भागवत, पूजा भांगरे आदींच्या पथकाने या गुन्ह्य़ाचा तांत्रिक सखोल तपास केला. या तपासात तो म्हणजे ती असल्याचे निष्पन्न झाले, त्यानुसार पथकाने काल, मंगळवारी पहाटे मुंबईत छापा टाकून नीलेश कदमला अटक केली. त्याने गुन्ह्य़ाची कबुली दिली व बनावट अकौंट तयार करुन काळे व इतरांची आर्थिक फसवणूक केल्याची कबुली दिली. फेसबुकवर ज्या मुली स्वत:चे फोटो अधिक प्रमाणात शेअर करतात, त्यांचे फोटो वापरुन नीलेश कदम बनावट अकौंट तयार करायचा व फसवणूक करत होता. त्याने अशा प्रकारे अनेकांना गंडा घातल्याची शक्यता पोलिसांना वाटते, त्यादृष्टीने तपास सुरु आहे.
