मुलीशी बोलण्याच्या वादातून विद्यार्थ्यांच्या खुनाचा प्रयत्न

एका मुलीशी बोलण्याच्या वादातून दोन विद्यार्थी आपसांत भिडले. यात एकाने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने दुसऱ्यावर चाकूने वार करून खून करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना कन्हान पोलीस ठाण्यांतर्गत सोमवारी रात्री घडली.

केतन पगारे (१५) रा. शिवनगर, कन्हान असे जखमी विद्यार्थ्यांचे नाव असून त्याच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे, तिसऱ्या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. रोहित कनोजिया आणि जिगर कनोजिया अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. जखमी केतन व अल्पवयीन आरोपी अनिकेत (नाव बदललेले) हे दहाव्या वर्गात शिकतात. केतन हा एका मुलीशी नियमित बोलत होता. तिघेही  एकाच शिकवणी वर्गात जायचे. केतन बोलत असलेल्या मुलीवर अनिकेत हा एकतर्फी प्रेम करत होता. अनेकदा त्याने केतनला तिच्यासोबत बोलण्यावरून हटकले. पण, तो नियमित तिच्याशी बोलायचा. सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास ते शिकवणी वर्गाला जात होते. केतन हा मुलीशी रस्त्याने बोलत जात असताना अनिकेतने त्याला स्वत:जवळ बोलावले व हटकले. नंतर केतनची मानगूट पकडली. भांडण सुटल्यानंतर केतन शिकवणी वर्गात गेला. पण, वर्गात जाण्यापूर्वी त्याने बघून घेण्याची धमकी दिली. यावेळी अनिकेतला भीती वाटली व त्याने जिगर व रोहित या मित्रांना बोलावून घेतले. शिकवणी वर्ग सुटल्यानंतर केतन हा चुलत बहिणीसोबत घरी जात असताना आरोपींनी त्याला रस्त्यात गाठले व पाठीमागून त्याच्यावर चाकूने हल्ला केला. चाकू मांडीवर व पोटावर मारले व त्यानंतर आरोपी पळून गेले. चुलत बहिणीने आपल्या वडिलांना घटनेची माहिती दिली. केतनला कन्हानमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला नागपूरला मेयो रुग्णालयात हलवले असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पण, अद्यापही त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती कन्हानचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे यांनी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली असून अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *