तांदळाअभावी अनेक शाळांमध्ये खिचडी वाटप बंद

माध्यान्ह भोजन योजनेचे नियोजन बिघडले :- शाळेची मध्यंतराची घंटा वाजली पण खिचडी खाण्याच्या ओढीने वर्गाबाहेर पडणाऱ्या मुलांचा दुसऱ्याच क्षणी हिरमोड झाला. तांदूळ संपल्यामुळे आजपासून खिचडी मिळणार नाही, अशी शिक्षकांकडून आलेली सूचना ऐकताच मुले हिरमुसली. काही पुन्हा वर्गात परतली तर काहींनी आप-आपले डबे उघडले.

जिल्ह्यतील शाळांना तांदूळ-धान्य आदी साहित्याचा नोव्हेंबर, डिसेंबर महिन्याचा पुरवठा अजूनही झाला नसल्यामुळे मध्यंतरात शाळांमध्ये शिजणाऱ्या खिचडीपासून विद्यार्थी वंचित आहेत. जिल्ह्यतील अनेक शाळांमध्ये सध्या खिचडी शिजत नाही. जिल्ह्य़ातील शाळांची संख्या सुमारे एक हजार ३२ एवढी असून या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन योजनेंतर्गत खिचडीचे वाटप होते.

शासनाकडून ऑक्टोबर महिन्यापर्यंत तांदूळ आदी धान्यांचा पुरवठा झाला होता. नोव्हेंबर, डिसेंबरची मागणी नोंदवूनही अद्याप धान्याचा पुरवठा झालेला नाही. शाळेतील एका विद्यार्थ्यांला प्रतिदिन अडीचशे ग्रॅम पुलाव देणे क्रमप्राप्त आहे. हा आहार देताना त्यामध्ये बटाटे, कोबी, वाटाणा आदी पदार्थाचा समावेश आवश्यक आहे.

हिंगोलीतील भारतीय विद्यामंदिर शाळेने तर मंगळवारी शाळेत तांदूळ नसल्यामुळे खिचडी मिळणार नसल्याचे जाहीर केले. याच शाळेबरोबर इतरही शाळेतील विद्यार्थ्यांना तांदळाअभावी खिचडीपासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र आहे. ज्यामध्ये खेड, गारमाळ, करंजाळा, सावा, टाकळी, सावरगाव (बंगला), काळकोंडी, बोरजा लासिना, पिंपरी आदी शाळांचा समावेश आहे.

पोषण आहाराच्या थकित देयका संदर्भात शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता, सेनगाव, औंढा नागनाथ, तालुक्यातील देयक बँकेत जमा करण्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर वसमत, कळमनुरी, हिंगोली, तीन तालुक्यातील  देयका संदर्भातील प्रस्ताव आले नाहीत, असे सांगण्यात आले. या संदर्भात मुख्याध्यापकाने दर महिन्याच्या ५ तारखेच्या आत देयकाचे प्रस्ताव देणे बंधनकारक असताना मुख्याध्यापकांकडूनच प्रस्ताव दाखल करण्यास विलंब होत असल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे. शासनाकडून तांदूळ पुरवठा केला जातो. सुरुवातीला मुख्याध्यापकांनी खर्च करणे अपेक्षित आहे. मात्र, काही शाळेचे मुख्याध्यापक आपली जबाबदारी टाळून बचतगटांकरवी खर्च करून घेतात. देयक थकल्यानंतर बचतगटही याकडे दुर्लक्ष करतात, असेही शिक्षण विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

साहित्य उपलब्ध नाही

अनेक शाळांना माध्यान्ह भोजन आहार योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्यापर्यंतच्या मालाचा पुरवठा झाला होता. नोव्हेंबर-डिसेंबरच्या मागणीची नोंद नाही. त्यामुळे अद्याप खिचडीचे साहित्य उपलब्ध झाले नाही. त्यामुळे अनेक शाळेत खिचडी शिजत नाही. नोव्हेंबर-डिसेंबरचे धान्य मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. – यू. के. राऊत, जिल्हा अधीक्षक, शालेय भोजन आहार योजना तथा प्रभारी गट शिक्षणाधिकारी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *