कोल्हापूरच्या सुपुत्राला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण, महाराष्ट्रावर शोककळा

जम्मू-काश्मीरच्या राजुरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आलं आहे. जोतिबा चौगुले (वय ३६ रा. महागाव, ता.गडहिंग्लज, जि. कोल्‍हापूर) असे या शहीद जवानाचे नाव आहे.

सोमवारी (दि.१६) राजुरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पहाटे ३.०० वाजण्याच्या सुमारास जोतिबा चौगुले हे शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि. १७ डिसेंबर) दुपारी महागाव येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

जोतिबा चौगुले जम्मू काश्मीरच्या राजुरी सेक्टरमध्ये मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते, अशी प्राथमिक माहिती आहे. ही बातमी समजताच चौगुले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून महाराष्ट्रात सर्वत्र शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी यशोदा, मुलगा अथर्व ( वय ९ ) मुलगा हर्षद (वय ३ ) असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात त्यांच्या गावी उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासणे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *