यात्रेत गॅस फुग्यात भरताना टाकीचा स्फोट ; मुलगी ठार, सात जखमी

 तालुक्यातील घोडेगाव येथील यात्रेत सोमवारी सकाळी फुग्यांमध्ये गॅस भरताना टाकीचा स्फोट होऊन १५ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर सात जण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना धुळे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अन्य जखमींवर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घोडेगावच्या खडक वस्तीवरील पिरबाबाच्या यात्रेस रविवारपासून सुरुवात झाली. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास फुगे विकणाऱ्या अन्वर अली या विक्रेत्याकडे लहान मुलांची फुगे घेण्यासाठी गर्दी उसळली होती. यादरम्यान विक्रेता फुग्यामध्ये गॅस भरत असतानाच अचानक गॅस टाकीचा स्फोट झाल्याने फुगे घेण्यासाठी तेथे उभी असलेली सोनी सुभाष गांगुर्डे (१५) या मुलीचा जागीच मृत्यू झाला. तसेच फुगे विक्रेत्यासह शुभांगी पवार (१६), यश पवार (९), रामलाल गांगुर्डे (६), पुष्पा गायकवाड (१४), दिदी पवार (८), निशा पवार (८) हे सहा जण जखमी झाले. फुगे भरण्याच्या सिलिंडरचा स्फोट झाल्याची वार्ता गावात पसरताच स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली. ग्रामस्थांनी जखमींना तातडीने येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमी असलेल्या शुभांगी आणि यश यांना पुढील उपचारासाठी धुळे येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले असून अन्य जखमींवर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या स्फोटप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *