अंधेरी येथील कामगार विमा रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीला उद्या, मंगळवारी एक वर्ष पूर्ण होत असताना, त्याच्या दोनच दिवस आधी, रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास याच रुग्णालयाच्या आवारात, वैद्यकीय कर्मचारी राहत असलेल्या क्वाटर्समध्ये पुन्हा एकदा मोठी आग लागली. आवारात अडगळीत ठेवलेल्या वस्तूंमध्ये द्रव्यांमुळे स्फोट होऊन ही आग लागल्याची शक्यता व्यक्त होत आहे. वर्षभरापूर्वी भीषण दुर्घटना घडल्यानंतरही या रुग्णालयाच्या अवस्थेकडे गांभीर्याने का पाहिले जात नाही, असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
मागील अनेक वर्षांपासून या रुग्णालयाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वायर, कचरा व लाकडाचे बिनवापराचे साहित्य पडून आहेत. रसायनांचे वापरात नसलेले ड्रमही येथे ठेवण्यात आले आहेत. याच अडगळीतल्या वस्तूंमध्ये ठेवलेल्या द्रव्यामुळे स्फोट होऊन ही आग लागल्याची शक्यता व्यक्त होत आहे. आग लागल्यानंतर लाकूड तसेच अडगळीमध्ये ठेवलेल्या वस्तूंनी पेट घेतला. रविवार असल्यामुळे कर्मचारी आराम करत असतानाच, ही आग लागल्यामुळे एकच गोंधळ उडाला. कर्मचाऱ्यांनी तातडीने बाहेर धाव घेत, आग विझवण्यासाठी रेती, पाणी तसेच घरांमधील २० लहान अग्निशमन सिलिंडरचा वापर केला. अग्निशमन दलानेही तातडीने धाव घेत आग नियंत्रणामध्ये आणली. मात्र वेळीच लक्षात आले नसते, तर अनर्थ घडला असता, अशी भिती कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात याच रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे सहा जणांचा मृत्यू झाला होता, तर १४६ जण होरपळले होते.
या घटनेनंतर या रुग्णालयाला टाळे ठोकण्यात आले. येथील वैद्यकीय तज्ज्ञ तसेच कर्मचाऱ्यांना कांदिवली येथील कामगार रुग्णालयामध्ये स्थलांतरित करण्यात आले. या रुग्णालयातील सेवा कांदिवली येथे स्थलांतरित झाल्या असल्या, तरीही सिटीस्कॅन आणि एमआरआय ही दोन प्रमुख वैद्यकीय उपकरणे अद्याप तिथे नेण्यात आलेली नाहीत. त्यामुळे रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळण्यामध्ये अडचणी येत आहेत. पश्चिम उपनगरांमधील हे रुग्णालय या परिसरामध्ये राहणाऱ्या कामगारांसाठी महत्त्वाचा आधार होते. आता मात्र कांदिवली येथे हे रुग्णालय स्थलांतरित केल्यानंतर तेथे योग्य त्या सुविधा मिळत नसल्याने रुग्णांचेही हाल होत आहेत.
दुरुस्तीबाबत निर्णय नाहीच
आज वर्षभरानंतरही अंधेरी येथील या रुग्णालयाची दुरवस्था कायम आहे. सहा महिन्यांपूर्वी या रुग्णालयातील आतल्या भागामधील लाद्याही निखळून पडल्या होत्या. रुग्णालयाच्या दुरुस्तीबाबत एक वर्षानंतरही ठोस निर्णय होऊ शकलेला नाही. केंद्र सरकारकडे यासंदर्भातील सर्व कागदपत्रे देण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या दुरुस्तीच्या कामासाठी जी आर्थिक तरतूद हवी आहे, त्यासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही.
वर्षपूर्तीनंतर श्रद्धांजली सभा
या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळाली असली, तरीही आपले माणूस गमावल्याचे त्यांचे दुःख कायम आहे. हे रुग्णालय पुन्हा सुरू न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्येही अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर, अंधेरी येथील रुग्णालयाच्या परिसरामध्ये मंगळवारी सकाळी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
