लग्न लावत नाही मुलानेच आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना सातऱ्यात घडली आहे. मुलाने आईच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली. खटाव तालुक्यातील मोराळे येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. किरण शहाजी शिंदे असं या २८ वर्षाय आरोपीचं नाव आहे. वडूज पोलिसांनी किरण शिंदेला ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी किरण शिंदे रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घरी आला आणि आई कांताबाई शिंदे हिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. माझ्यापेक्षाही लहान मुलांची लग्न झाली, पण माझं लग्न का करत नाही असा प्रश्न विचारत किरण शिंदे आईला शिवीगाळ करु लागला. यावेळी त्याने दरवाजाला कडी लावून घेतली आणि कुऱ्हाडीने वार करत निर्घृण हत्या केली.
गोंधळ ऐकून किरण शिंदेचे वडील शहाजी शिंदे यांनी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. पण दरवाजा तोडला तुमचाही खून करेन अशी धमकी आरोपीने देली. शहाजी शिंदे यांनी तात्काळ वडूज पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी गांभीर्य ओळखत तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली.
