चाचणी परीक्षेत कमी गुण मिळवणाऱ्या चौथीच्या वर्गातील ७ विद्यार्थ्यांच्या तोंडाला काळं फासून त्यांना वर्गातून फिरवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हरयाणातील हिस्सार येथील एका खासगी शाळेत ही घटना घडली आहे. या प्रकाराविरोधात पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे.
हिस्सार येथील ‘लक्ष्मी कॉन्व्हेंट स्कूल’ या खासगी शाळेत शुक्रवारी (५ डिसेंबर) हा प्रकार घडला आहे. चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या ७ चिमुकल्यांना चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाले होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षा करताना त्यांच्या तोंडाला काळं फासून त्यांना वर्गात इतर विद्यार्थ्यांसमोर फिरवून अपमानित करण्यात आलं. यामध्ये २ मुलींचा समावेश आहे.
याप्रकरणी पालकांनी आरोप केला आहे की, “आमच्या निष्पाप मुलांच्या चेहऱ्याला काळं फासत त्यांना वर्गात फिरवून अपमानित करण्यात आलं आहे.” या शाळेचे व्यवस्थापक आणि मुख्याध्यापकांविरोधात पालकांनी पोलिसांत तक्रार दिली असून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. पोलिसांनीही मुलींच्या तोंडाला काळं फासल्याची तक्रार दाखल झाल्याचे सांगत तपास सुरु असल्याचे म्हटले आहे.
