चरण्यासाठी गायरानात आलेल्या उंटावर कुऱ्हाडीचे घाव घालीत त्याला ठार मारल्याप्रकरणी दोघा जणांवर सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुक्या जनावरावर अमानुषपणे कुर्हाडीचे वार घालून त्याला ठार मारल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नांदेड जिल्ह्य़ातील माळेगाव येथील यात्रेसाठी घनसावंगी येथील गुलाब सुंदर सय्यद हे आपला उंट घेऊन जात होते. ते सोनपेठ तालुक्यातील शेळगाव जवळील हारसिंग तांडा येथून जात होते. त्यावेळी त्यांनी तेथील गायरानात उंट चारण्यासाठी नेला. तेथील कांचन भोसले व पप्पू िशदे यांनी गायरानात चारण्यासाठी उंट का आणला,या कारणावरून उंटावर कुऱ्हाडीचे घाव घातले.
या मारहाणीत उंट जबर जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. घटना घडताच कांचन भोसले व पप्पू शिंदे हे दोघेही फरार झाले. याप्रकरणी गुलाब सुंदर सय्यद यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
