‘नागवेलींचे पानमळे’ नामशेष होण्याच्या मार्गावर

आपल्यापैकी अनेकजण पान खाण्याचे शौकीन असतात. जेवणानंतर पान खाणं ही प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. पान तयार करण्यासाठी ज्या वेलीची पानं वापरण्यात येतात त्यांना ‘नागवेल’ असंही म्हटल्या जातं. कमी होत चाललेला पाणीसाठा, पीकविमा योजनेचं नसलेलं कवच आणि वातावरणात सतत बदल होत असल्यानं नागवेलींपासून पानांचं उत्पादन घेणारे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

‘खईके पान बनारस वाला, खुल जाये बंद अकल का ताला’, या डॉन चित्रपटातील गाण्यानं नागवेलींच्या पानांची महती देशभरात पोहचवली. ‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा’ या बहारदार लावणीनं त्यात आणखी रंगत आणली. मराठी ,हिंदी चित्रपटातील गाण्यातून आणि लावण्यांमधून नागवेलींच्या पानात अक्षरशः गोडवा आणला. पण अगदी पुरातन काळापासून महत्व असलेल्या नागवेलींच्या पानाचे मळे आजघडीला सरकार आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेवटच्या घटका मोजतायत. जालना जिल्ह्यातील भारज गावात 10 वर्षांपूर्वी पानाचे शेकडो मळे अस्तित्वात होते. पण वातावरणात बदल झाला.पावसाचं प्रमाण कमी झालं. गारपिटीचा फटका बसू लागला.आणि अशा परिस्थितीत सरकार आणि प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यानं आजघडीला भारज गावात फक्त 50 ते 60 पानमळे शिल्लक राहिले आहेत.

नागवेलीच्या पानाचा मळा उभा करण्यासाठी अथक कष्ट घ्यावे लागतात. वेलींची लागवड करण्याआधी उंच वाढणाऱ्या शेवगा झाडाची लागवड करावी लागते. नंतर पानाच्या वेली लावाव्या लागतात.नंतर नागवेल या झाडांवर चढवली जाते. कमी पाण्यात वेली वाढण्यासाठी ठिंबक सिंचनाचा वापर हमखास करावा लागतो.तारेच्या कंपाऊंड बरोबरच पानवेलींना वादळाचा फटका बसू नये म्हणून जाळ्या देखील लावाव्या लागतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *