आजपर्यंत अनेक विवाह पाहिले असतील. जमिनीवरील विवाह, खोल समुद्रात पाण्यात बोटीतील विवाह, हवेत विमानातील विवाह पाहिला असेल पण एक आगळा वेगळा विवाह रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात पार पडला. पुणे जिल्ह्याच्या चाकण औद्योगिक नगरीमध्ये हा आगळा वेगळा विवाह संपन्न झाला. हा विवाह अतिदक्षता विभागामध्ये संपन्न करण्यामागे कारण ही तसंच होतं. लग्नाचं आमिष दाखवून सुरज नलावडे या तरुणाने वर्षभर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या तरुणीवर अर्थात नववधूवर बलात्कार केला. त्यानंतर पीडित तरुणीने लग्नाचा तगादा लावताच संबंधित तरुणाने लग्नाला नकार दिला.
नकार ऐकताच तरुणीने फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. दरम्यान, काही संघटनांच्या दबावामुळे संबंधित तरुणाला रुग्णालयात आणून चक्क रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात या दोघांचं लग्न लावून दिलं. मात्र लग्न लागताच तरुण तिथून पळून गेला. हा सर्व प्रकार काही दिवसांपूर्वी चाकण येथे घडला असून आता या प्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर संबंधित तरुणाविरोधात चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी मुळच्या बुलढाणा जिल्ह्यातील व सध्या चाकण येथील आंबेठाण चौक परिसरात वास्तव्यास असलेल्या २६ वर्षीय पिडीत तरुणीने चाकण पोलिसांत फिर्याद दिली आहे. चाकण पोलिसांनी बुधवारी सुरज भारत नलावडेवर बलात्कार व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सबंधित पिडीत तरुणी चाकण येथे तिच्या मैत्रिणीबरोबर आंबेठाण चौकात राहत होती. गेल्या वर्षी, तिची सुरजशी ओळख झाली होती. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. तरुण नेहमी तिच्या पिडितेच्या संपर्कात होता.
दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले. सुरजने पिडीत तरुणीला आपली जात वेगळी असल्याने आपलं लग्न होवू शकत नाही, असं सांगत लग्नास नकार दिल्याने पिडीत तरुणीने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. तरुणाने आपल्यावर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होवू नये म्हणून पिडीत तरुणीसोबत हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात विवाह करणं पसंत केलं.
