उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये एक भयंकर घटना घडली. दोन अल्पवयीन मुलींनी आपल्या दीड वर्षांच्या लहान भावाला गंगेच्या प्रवाहात बुडवले. पूरब असं मृत मुलाचं नाव आहे. हा मुलगा शुक्रवारपासून बेपत्ता होता. त्याला आसपासच्या लोकांनी अखेरचा आपल्या बहिणींसोबत पाहिला होता. लहान भावाला सतत सांभाळण्याच्या कटकटीतून मुक्त होण्यासाठी दोघींनी हे कृत्य केल्याचं पोलिसांना सांगितलं.
पूरबचे वडील सोनू कुमार लोढा हे मंडी भागात राहतात. ते मेकॅनिकचं काम करतात. रविवारी त्यांनी मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली होती. नातेवाईकांनी आधी मुलगा चोरी झाल्याचा आरोप केला. पोलिसांना पूरबचा सांभाळ करणाऱ्या बहिणींवर संशय होता. १३ आणि १४ वर्षांच्या दोन बहिणी या चिमुकल्याला नदीजवळ घेऊन जाताना या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्या. या फुटेजनंतरच पोलिसांनी या बहिणींवर संशय घेतला.
पोलिसांच्या चौकशीत या बहिणींचा बांध फुटला आणि त्यांनी केलेला प्रकार सांगितला. आपल्या भावाचं पालनपोषण करणं दोघींना मंजूर नव्हतं. म्हणूनच त्यांनी या चिमुकल्याला नदीत ढकलून दिलं. आतापर्यंत पोलिसांना या मुलाचा मृतदेह मिळालेला नाही. अशीच एक घटना काही महिन्यांपूर्वी हरिद्वारमध्येच घडली होती. एका महिलेने आपल्या बाळाला गंगेत बुडवलं होतं. याच घटनेमुळे या दोन बहिणींना हा भावाचा काटा काढण्याचा कट सुचल्याचं त्यांनी सांगितलं.
