अमिषा पटेलवर फसवणूकीचा आरोप, १० लाखांचा चेक झाला बाउन्स

बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलविरोधात इंदूरमधील न्यायालयात १० लाख रुपयांचा चेक बाउन्स झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुराव्यांच्या आधारे कोर्टाने अमीषा पटेलविरोधात नोटीस बजावली असून २७ जानेवारी रोजी तिला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. इंदूर येथील एका युवतीकडून सिनेप्रोडक्शनच्या नावाखाली तब्बल १० लाख रुपये घेतले होते. यानंतर अमिषाने तिला परत १० लाख रुपयाचा चेक दिला जो बाउन्स झाला.

चेक बाउन्स झाल्यावर त्या युवतीने अनेकदा अमिषाकडे पैसे मागितले, पण अमिषाने पैसे दिले नाही. अखेर युवतीने तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. अमिषाने दिलेला चेक बाउन्स होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिच्याविरोधात रांची कोर्टात तीन कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणी खटला सुरू असून अमिषाविरोधात अटक वॉरन्ट जारी करण्यात आला आहे.

इंदूरमधील जिल्हा कोर्टात दाखल करण्यात आलेल्या तक्रारी प्रकरणी वकील नितेश परमार म्हणाले की, पिंक सिटीमध्ये राहणारी निशा छीपा ही अमिषा पटेलला ओळखायची. फिल्म प्रोडक्शनसंबंधीत अमिषाने निशाकडून १० लाख रुपये घेतले होते आणि त्याबदल्यात २० एप्रिल २०१९ चा चेकही दिला होता. दिलेल्या तारखेनंतर निशाने हा चेक बँकेत जमा केला असता तो बाउन्स झाला.

चेक बाउन्सप्रकरणी अमिषा पटेलविरोधात जारी केलं अटक वॉरन्ट
चेक बाउन्स झाल्यानंतर अमिषाकडे अनेकदा पैसे मागण्यात आले, पण तिने पैसे दिले नाहीत. मीडिया रिपोर्टनुसार वकील नितेश परमार यांच्या माध्यमातून अमिषाला नोटिस बजावण्यात आली, पण तिने त्याकडेही कानाडोळा केला. यानंतर तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. प्रथम श्रेणी न्यायिक दंडाधिकारी मनीष भट्ट यांनी तक्रारीवर सुनवाई देत २७ जानेवारीला अमिषा पटेलला न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *