महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्राने ६०० कोटींची अंतरिम मदत जाहीर केली असल्याचे कृषी राज्यमंत्री पुरूषोत्तम रूपाला यांनी शुक्रवारी राज्यसभेत सांगितले. प्रश्नोत्तराच्या तासाला असे स्पष्ट केले की, महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातही ऑक्टोबरमधील पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने केलेल्या प्राथमिक विनंतीनुसार सरकारने नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी शिष्टमंडळ पाठवले होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही शेतकऱ्यांना सहाशे कोटींची अंतरिम मदत देण्याचे ठरवले आहे पण हा आकडा अंतिम समजण्याचे कारण नाही. महाराष्ट्रात अगदी नोव्हेंबपर्यंत पडत राहिलेल्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले होते. केंद्र सरकार हे राज्याकडून पिकांच्या नुकसानीबाबत अंतिम अंदाज मिळण्याची वाट पहात आहे.
आणखी एका प्रश्नावर त्यांनी सांगितले की, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ३१०० कोटी रुपयांची रक्कम उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्य सरकारने पात्र शेतकऱ्यांची नावे पाठवल्यानंतर हा निधी देण्यात आला आहे.
