खेलरत्न’साठी सानिया मिर्झाच्या नावावर शिक्कामोर्तब

टेनिसस्टार सानिया मिर्झाला देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान अर्थात राजीव गांधी ‘खेलरत्न’ने सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने काही दिवसांपूर्वीच सानियाच्या नावाची शिफारस केली होती.

सानिया मिर्झा ही खेलरत्न पुरस्काराने सन्मानित होणारी पहिला महिला टेनिसपटू आहे. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जंयतीला अर्थात 29 ऑगस्ट रोजी ‘क्रीडा दिना’ला हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

सानियानं गेल्या महिन्यात मार्टिना हिंगिसच्या साथीने खेळताना, विम्बल्डनमध्ये महिला दुहेरीचं जेतेपद मिळवलं होतं. तसंच महिला दुहेरीत सानियाने अव्वल रँकिंगही गाठलं.

याआधी मिश्र दुहेरीत सानियाच्या खात्यात तीन ग्रँड स्लॅम जेतेपदं जमा आहेत. भारतीय टेनिस संघटना म्हणजे ‘आयटा’ने सानियाच्या नावाचा प्रस्ताव क्रीडा मंत्रालयासमोर ठेवला होता.

सानियासह स्क्वॉशपटू दीपिका पल्लिकल, थाळीफेकपटू विकास गौडा, धावपटू टिंटू लुकाची नावंही ‘खेलरत्न’साठी चर्चेत होती.

खरंतर पुरस्कारासाठी शिफारस करण्याची मुदत उलटून गेल्यावरही क्रीडा मंत्र्यांनी तो स्वीकारला आणि पुरस्कार समितीकडे पाठवला होता. अखेर सानिया मिर्झाला 29 ऑगस्ट रोजी ‘खेलरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *