पंचतारांकित हॉटेलचा आणखी एका कलाकाराला फटका; तीन अंड्यांचे बिल सोळाशे रुपये

बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांना संगीत देणारी विशाल-शेखर यांची जोडी साऱ्यांनाच ठावूक आहे. सध्या शेखर रवजियानी यांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेखर यांनी ट्विटरवर एक बिल शेअर केलं आहे. या बिलामध्ये त्याच्याकडून तीन अंड्यांसाठी तब्बल १६७२ रुपये आकारण्यात आल्याचं त्याने सांगितलं. त्याची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून त्यावर कमेंटचा पाऊस पडत आहे.

यापूर्वी अभिनेता राहुल बोस याला महागड्या बिलाचा फटका बसला होता. चंदीगढमधील एका हॉटेलने राहुल बोसकडून दोन केळ्यांसाठी चक्क ४४२ रुपये आकारले होते. या घटनेनंतर कार्तिक धर या व्यक्तीनेही ट्विटरवर एक पोस्ट करुन त्याला आलेला अनुभव शेअर केला होता. त्याच्याकडूनही एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दोन अंड्यांसाठी १७०० रुपये आकारले होते. तसाच प्रत्यय आता शेखर रविजानी याला आला.

शेखरने त्याच्या ट्विटरवर एका पंचतारांकित हॉटेलच्या बिलाचा फोटो शेअर केला. यामध्ये त्याला ३ अंड्यांसाठी चक्क १३५० रुपये मोजावे लागले. सोबतच कराची रक्कम धरुन एकूण बिल १६७२ रुपये झालं. त्यामुळेच त्याने हा फोटो शेअर केला. ३ अंड्यासाठी १६७२? हे जरा जास्त महागडं खाणं आहे नाही?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *