दोन रेल्वे गाड्या एकाच रुळावर आल्याने टक्कर; ३० प्रवाशी जखमी

तेलंगणात दोन रेल्वे गाड्या एकाच रुळावर आल्याने त्यांची समोरासमोर टक्कर झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात सुमाऱे ३० प्रवाशी जखमी झाले आहेत. येथील काचेगुडा रेल्वे स्थानकात सोमवारी हा प्रकार घडला.

दक्षिण मध्य रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अपघातग्रस्त दोन रेल्वे गाड्यांपैकी एक एमएमटीएस तर दुसरी इंटरसिटी एक्स्प्रेस होती. सुदैवानं रेल्वे स्थानकात दाखल झाल्यानंतर दोन्ही रेल्वे गाड्या या कमी वेगात होत्या, अन्यथा भीषण अपघात होऊ शकला असता.

काँगो इंटरसिटी एक्स्प्रेस ही काचेगुडा रेल्वे स्थानकात ज्या प्लॅटफॉर्मवर थांबली होती त्याच प्लॅटफॉर्मवर एमएमटीएम रेल्वे गाडी आली आणि या दोन्ही गाड्यांमध्ये टक्कर झाली. सिग्नलमधील बिघाडामुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातानांतर रेल्वे प्रशासनाने काही गाड्यांचे वेळापत्रक बदलले. अपघातानंतर नुकसान झालेल्या बोगी रेल्वे रुळावरुन हलवण्याचे काम सुरु आहे. यामुळे अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रक कोलमडले आहे.

दरम्यान, स्थानिक पोलीस आणि इतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी जखमींवर प्रथमोपचार केले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *