एकीकडे ‘दृष्यम’सारख्या चित्रपटातून एक कुटुंबवत्सल पिता आपल्या लेकीच्या संरक्षणासाठी कुठल्या थराला जाऊ शकतो, ही कथा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेलं असतानाच दुसरीकडे पावित्र्याच्या भ्रामक कल्पनांमुळे एका पित्याने लेकीला मृत्यूच्या तोंडी ढकलून दिल्याचं उदाहरण पाहायला मिळत आहे. परपुरुषाच्या स्पर्शापेक्षा लेकीने बुडून मेलेलं बरं अशी ताठर भूमिका घेतल्यामुळे एका तरुणीला जीव गमवावा लागला आहे.
दुबईतील बीचवर एक आशियाई कुटुंब सहलीसाठी गेलं होतं. त्यावेळी 20 वर्षांची तरुणी काही कुटुंबियांसमवेत समुद्रात पोहण्याचा आनंद घेत होती. मात्र अचानक आलेल्या लाटांमुळे ती गटांगळ्या खाऊ लागली. तिचा आरडाओरडा ऐकून किनाऱ्यावर असलेल्या तिच्या पित्याच्याही काळजात चर्र झालं नि क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी समुद्रात उडी घेतली.
पित्यासोबत समुद्रावरील बचाव पथकाने तरुणीच्या दिशेने धाव घेतली. मात्र तरुणीला मदतीचा हात पोहचवणार तोच तिच्या वडिलांनी पथकाला आडकाठी केली. शेजारी समुद्रात गटांगळ्या खात मृत्यूशी झुंज देणारी पोटची पोर असतानाही पित्याने मात्र ‘परपुरुषाच्या स्पर्शाने तिने अपवित्र होण्यापेक्षा मृत्यूला कवटाळावं’ अशी ताठर भूमिका घेतली.
पित्याकडे दुर्लक्ष करत बचाव पथकाने तरुणीच्या दिशेने कूच केलं, मात्र पित्याने हटवादीपणा सोडला नाही. इतकंच नाही तर बचाव पथकातील दोघांचा पवित्रा पाहून पिता आक्रमक झाले. विनंत्या, दटावणी असे सगळे प्रकार करुनही चकार न ऐकणाऱ्या पित्यापुढे हतबल बचाव पथकाने हार मानली.
अखेर बचाव पथक आणि पित्याच्या डोळ्यासमोर त्या मुलीचा समुद्राच्या खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. समुद्रातून बाहेर आल्यानंतर दुबई पोलिसांनी संबंधित पित्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याचप्रमाणे बचाव पथकाच्या कामात अडथळा आणत मुलीच्या मृत्यूला जबाबदार राहिल्याप्रकरणी पित्यावर खटला चालवण्यात येणार आहे.
प्रतिष्ठा, पावित्र्या यासारख्या भ्रामक समजुती एखाद्याच्या जीवापेक्षा मौल्यवान ठरत असल्यामुळे सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. माणुसकीला विसरत समाज नेमका कोणत्या दिशेने चालला आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे
