मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते. सोमवारी राज्यपालांची भेट आम्ही घेतली त्यांना राज्यातली परिस्थिती मांडली. सध्या आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत असंही राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच महाराष्ट्राचा निर्णय आता महाराष्ट्रच घेईल असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सरकार स्थापनेचं काय होणार हा पेच जैसे थेच आहे.
राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावं यासाठी उद्धव ठाकरेही आग्रही आहेत. त्याचमुळे त्यांनी आम्हाला राज्यपालांकडे पाठवलं होतं. महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीबाबत शिवसेनेची भूमिका काय याची माहिती त्यांनी आम्हाला राज्यपालांना द्यायला सांगितली त्याच अनुषंगाने आम्ही राज्यपालांची भेट घेतली असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. शरद पवार मुख्यमंत्री होऊ शकतात अशी एक चर्चा आहे त्याबाबत काय सांगाल असा प्रश्न जेव्हा राऊत यांना विचारण्यात आला तेव्हा या अफवांवर विश्वास ठेवू नका असे राऊत यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली. राज्यपातळीवर या प्रश्नाची चर्चा करावी असं ठरलं आहे त्याबाबत काय सांगाल? असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, दिल्लीत काय घडलं हे मला माहिती नाही. दुसऱ्या पक्षाच्या गोटात काय सुरु आहे ते मला माहित नाही. महाराष्ट्राच्या सरकार स्थापनेचा निर्णय महाराष्ट्रातच होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच जो निर्णय घेतला जाईल तो महाराष्ट्राच्या जनतेच्या मनाप्रमाणेच घेतला जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे.
