येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल झालेल्या कोठारीच्या रहिवासी शहीदा शेख यांचे बाळ पोटात दगावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.
बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथील रहिवासी असलेल्या शहीदा शेख शनिवारी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांची दखल न घेतल्याने त्यांना चंद्रपूर येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र तीन तासापूर्वीच त्यांचे बाळ पोटातच दगावल्याचे त्यांना माहिती झाले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूतीपूर्वीच बाळ दगावल्याची घटना घडली, अशी तक्रार जिल्हा परिषद सदस्या वैशाली बुद्धलवार यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून दिली. विशेष म्हणजे, केवळ शहीदा शेख नाही तर जिल्हा रुग्णालयात अशा पद्धतीने डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे किंवा उपचाराअभावी अनेक बालकांचा आईच्या पोटातच किंवा जन्मानंतर मृत्यू झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहे. तेव्हा ही अतिशय गंभीर बाब असल्यामुळे या प्रकरणाची सखोल त्वरित चौकशी करून घटनेला जबाबदार असलेल्या डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश जिल्हय़ाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.
