अफगाणिस्तानची राजधानी काबुल येथे सोमवारी दुपारी भीषण बॉम्बस्फोट झाला. काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या तपासणी नाक्याजवळ हा स्फोट झाला. या स्फोटात पाच अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाला असून सोळा जण जखमी झाले आहेत. हा स्फोट आत्मघातकी कार बॉम्बरने घडवून आणल्याची माहिती काबुल पोलिसांनी दिली असून सोमवारी सायंकाळी तालिबान या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
सोमवारी दुपारच्या सुमारास काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेल्या तपासणी नाक्यावर गाडय़ांची तपासणी सुरु होती. गर्दीची वेळ असल्याने विमानतळावर येण्यासाठी गाडय़ांच्या तपासणी नाक्यावर रांगा लागल्या होत्या. तितक्यात एक कार भरधाव वेगाने येऊन तपासणी नाक्याजवळ आदळली आणि तिचा भीषण स्फोट झाला. यानंतर घटनास्थळी एकच हलकल्लोळ माजला. या स्फोटामुळे हल्लेखोराची कार आणि आजूबाजूच्या इतर गाडय़ांच्या अक्षरश: चिंधडय़ा झाल्या.
यानंतर संपूर्ण काबुल शहरावर गडद काळ्या रंगाचा धूर पसरला होता. स्फोटानंतर तातडीने अग्निशमन दल, पोलीस आणि वैद्यकीय मदत पथकाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. ऐन गर्दीच्या वेळी हा स्फोट झाल्याने यात मोठे नुकसान झाल्याची माहिती काबुल पोलीस दलाचे उपप्रमुख जनरल गुल अघा रोहानी यांनी दिली.
यावेळी स्फोटानंतर पसरलेल्या ढिगा-यातून पाच मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे अफगाणिस्तान सरकारच्या नागरी आरोग्य विभागाचे प्रवक्ते वाहिदुल्ला मायर यांनी सांगितले. तर जखमी झालेल्या १६ जणांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यात एका लहानग्याचा आणि त्याच्या आईचाही समावेश आहे.
जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही वाहिदुल्ला यांनी व्यक्त केली. तालिबानचा म्होरक्या मुल्ला ओमर याचा मृत्यू झाल्यानंतर मुल्ला अख्तर मन्सूर याला तालिबानचा नवा प्रमुख म्हणून निवडण्यात आले आहे. त्याच्या निवडीनंतर अफगाणिस्तानमध्ये मागील चार दिवसांत झालेला हा दुसरा मोठा हल्ला आहे. यापूर्वी शुक्रवारी येथील पोलीस अकादमी आणि अमेरिकन स्पेशल फोर्सच्या तळावर तालिबानने हल्ला केला होता. यात सुमारे ५१ जणांचा बळी गेला होता.
