मुदत ठेवी आणि भिशीच्या माध्यमातून १६ टक्के व्याजाचा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुडविन ज्वेलर्सच्या मालकांनी फसवणूक केल्याचा आरोप गुंतवणूकदारांकडून होऊ लागला असून डोंबिवलीनंतर, ठाणे आणि अंबरनाथ शहरामधील विविध पोलीस ठाण्यांत गुडविन ज्वेलर्सच्या मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्य़ामध्ये ६८ गुंतवणूकदारांची १ कोटी ६७ लाख ३३ हजार ६६० तर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात ५२ गुंतवणूकदारांची २ कोटी २१ लाख ४७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची बाब समोर आली आहे.
मुंबई आणि ठाणे जिल्ह्य़ातील विविध शहरांमध्ये सुनीलकुमार अकराकरण, सुधीरकुमार अकराकरण यांनी गुडविन ज्वेलर्सची दुकाने सुरू केली होती. या दुकानांच्या माध्यमातून त्यांनी विविध योजना सुरू केल्या होत्या. एका वर्षांच्या ठेवीवर १६ टक्के व्याज, दोन वर्षांच्या ठेवीवर १८ टक्के व्याज तर पाच वर्षांच्या ठेवीवर दामदुप्पट तसेच एक वर्षे भिशी भरली तर पुढील एका महिन्याचे पैसे गुडविन ज्वेलर्स भरणार आणि त्यानंतर दागिने किंवा १३ महिन्यांचे पैसे दिले जातील. त्याचप्रमाणे दोन वर्षे भिशी भरली तर पुढील चार महिन्यांचे पैसे गुडविन ज्वेलर्स भरेल, अशा स्वरूपाच्या या योजना होत्या. या योजनांच्या आमिषांना बळी पडून शेकडो गुंतवणूकदारांनी त्यात पैसे गुंतविले होते. आठ दिवसांपूर्वी शहरातील गुडविन ज्वेलर्सची दुकाने बंद करण्यात आली. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर ही दुकाने बंद असल्यामुळे गुंतवणूकदारांनी चौकशी करण्यास सुरुवात केली. त्या वेळेस दोघे मालक दुकाने बंद करून फरार झाल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली.
ऐन दिवाळीच्या तोंडावर गुडविन ज्वेलर्सने दुकाने बंद केल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये संतापाचे वातावरण असून त्यांनी आता गुडविन ज्वेलर्सच्या मालकांसह तेथील पदाधिकाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सुरुवात केली आहे. डोंबिवलीत ५४ गुंतवणूकदारांनी पुढे येऊन रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या गुंतवणूकदारांच्या फसवणुकीचा आकडा तीन कोटींच्या घरात आहे. या गुंतवणूकदारांनी दिलेल्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात गुडविन ज्वेलर्सच्या मालकांविरोधात पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्यापाठोपाठ आता ठाणे आणि अंबरनाथमधील गुंतवणूकदार पुढे आले असून ठाण्यातील ६८ गुंतवणूकदारांनी नौपाडा तर अंबरनाथमधील ५२ गुंतवणूकदारांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सुनीलकुमार अकराकरण, सुधीरकुमार अकराकरण या दोघांसह कंपनीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे सर्व जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
