पोलिसांनी ठोठावला १८ हजारांचा दंड, रिक्षाचालकाचा फिनाइल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

नवीन मोटार वाहन कायदा अंमलात आल्यापासून अनेक ठिकाणी चालकांना मोठ्या प्रमाणात दंड ठोठावण्यात आल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. एकीकडे काही राज्यांनी या कायद्याची अंमलबजावणी करण्यास नकार दिला आहे, तर दुसरीकडे काही राज्यांमध्ये या कायद्याची सक्तीने अंमलबजावणी करत बेशिस्त वाहन चालकांना दंड ठोठावला जात आहे. दरम्यान गुजरातमध्ये पोलिसांनी १८ हजारांचा दंड ठोठावल्याने रिक्षाचालकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

गुजरातमधील अहमदाबाद येथे ही घटना घडली आहे. रिक्षाचालकाचं नाव राजू सोलंकी असं आहे. पोलिसांनी राजू सोलंकी यांना १८ हजारांचा दंड ठोठावला होता. दंडाची ही रक्कम भरण्यासाठी पैसे नसल्याने राजू सोलंकी यांनी फिनाइल पिऊन आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ही रक्कम भरणं त्यांना शक्य नाही. दंडाची रक्कम न भरल्याने त्यांची रिक्षा पोलिसांनी जप्त केली आहे.

दरम्यान राजू सोलंकी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आपली रिक्षा जप्त करण्यात आली असल्याने आपण कामावरही जाऊ शकत नसल्याचं राजू सोलंकी सांगत आहे. राजू सोलंकी यांचं बी.कॉमपर्यंत शिक्षण झालं आहे. पण नोकरी न मिळाल्याने त्यांनी पोट भरण्यासाठी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *