चुंबन घेण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका विद्यार्थ्याने विद्यार्थिनीला जीवे मारल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील जबलपुरातील बिजापुरी गावात घडली. बळजबरीने चुंबन घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या विद्यार्थ्याला ही विद्यार्थिनी विरोध करत होती. ही खळबळजनक घटना ५ सप्टेंबरला घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
विद्यार्थिनीचा बळी घेणारा आरोपी हा या विद्यार्थिनीचा मित्रच असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटना घडली त्या दिवशी दोघे कनिष्ठ महाविद्यालयातून घरी जाताना आड वाटेला जात एका कालव्याजवळ बसले होते. याच ठिकाणी आरोपीने विद्यार्थिनीकडे चुंबनाची मागणी केली. त्यानंतर त्याने बळजबरी करत तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने त्याला दूर लोटले. यामुळे आरोपीला राग अनावर झाला. त्यानंतर रागाच्या भरात त्याने विद्यार्थिनीला जोराचा धक्का दिला आणि ती खाली असलेल्या दगडावर आदळली. विद्यार्थिनीच्या डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाला.
आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा
विद्यार्थिनी मृत पावल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपी घाबरला आणि त्याने तिचा मृतदेह पाचोळ्यामध्ये झाकून तिथून काढता पाय घेतला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
