विसर्जनासाठी प्रशासनाने सोमवारी रात्री खडकवासला धरणातून ३ हजार क्युसेक पाणी मुठा नदीत सोडले. विसर्जनादरम्यान कोणताही अपघात होऊ नये, यासाठी अग्निशमन दल, जीवरक्षक दुपारपासून नदीकाठावर तैनात होते. नागरिकांनी नदीत मूर्ती विसर्जन करण्याऐवजी हौदात करावी, असे आवाहन करणारे महापालिकेचे कर्मचारी आणि स्वयंसेवक नदी किनाऱ्यावर उभे होते. यंदा नागरिकांनी हौदात मूर्ती विसर्जन करण्याला अधिक पसंती दिली.
‘स्वच्छ’ संस्था आणि महापालिकेचे घनकचरा विभागाचे कर्मचारी निर्माल्य गोळा करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी उभे होते. नागरिकांनी नदीमध्ये, तसेच हौदात निर्माल्य टाकू नये, असे आवाहन करून हे कर्मचारी प्रत्येक मूर्तीला वाहिलेले हार, फुले आणि फळे नागरिकांना विनंती करून त्यांच्याकडून गोळा करीत होते.
मुंबईतही दीड दिवसांच्या गणपती मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत दीड दिवसांच्या ९०९७ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी २३४१ मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. तर रात्री नऊ वाजेपर्यंत सार्वजनिक ६०, घरगुती ३८५१० गणेश मूर्तीपैकी सार्वजनिक मंडळाच्या १६ मूर्तीचे कृतिम तलावात तर ९ हजार ६३३ गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान, महापालिकेने गणपती विसर्जनासाठी चोख व्यवस्था ठेवली होती.
लगबग गौरीच्या स्वागताची
गणराया पाठोपाठ दाखल होणाऱ्या महालक्ष्मींच्या स्वागतासाठी घराघरात महिलांची लगबग सुरू झाली आहे. गौरींचे वैविध्यपूर्ण मुखवटे, असंख्य प्रकाराचे दागिने, साड्या आणि सजावट साहित्यांनी सजलेल्या बाजारपेठांमध्ये सध्या महिलांची दिवसभर वर्दळ बघायला मिळते आहे. लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींना सजविण्यासाठी दर वर्षी नवनवीन दागिने, साड्या घेण्यासाठी महिला उत्सुक असतात. या वर्षीदेखील बाजारपेठेत गौरींचे मुखवटे, दागिने, साड्या, सजावटीसाठीचे असंख्य प्रकार दाखल झाले आहेत. गौरीपूजनाच्या साहित्य खरेदीसाठी तुळशीबाग, रविवार पेठेत खरेदीसासाठी महिलांची धावपळ सुरू आहे. यंदा सोमवारी गणपती बाप्पाचे आगमन झाले आणि गुरुवारी (५ सप्टेंबर) गौराई घरोघरी दाखल होणार आहेत.
