मुंबई, उपनगरांसह, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई आणि पालघरमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान, मुंबई, ठाण्यातील संततधार पावसाचा फटका लोकल वाहतुकीला बसला असून दोन्ही मार्गावरील लोकल १५ मिनिटे उशिराने धावत आहेत.
दादर, अंधेरी. मिरारोड, वसई, पालधर, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबईत पावसाचा जोर कायम आहे.
मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरांत रात्रीपासून पावसाला सुरूवात झाली असली तरी पहाटे ४ वाजता पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. मात्र पुन्हा सकाळी पावसाचा जोर वाढल्याने मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली.
गणेशभक्तांमध्ये चिंता
दरम्यान, आज घरोघरी आलेले दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होणार असून मुंबई, ठाण्यात कोसळणाऱ्या पावसामुळे गणेशभक्तांमध्ये चिंता पसरली आहे. पावसाचा जोर दिवसभर कायम राहिला तर त्याचा परिणाम दीड दिवसांच्या गणपती विसर्जनावर होणार आहे. आज हजारो गणेशभक्त दीड दिवसांच्या घरगुती गणपती विसर्जनासाठी बाहेर पडत असतात.
