मुंबईत झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर मृत्यूशी झुंज देत असलेल्या जालन्यातील तरुणीने अखेर औरंगाबादमधील रुग्णालयात बुधवारी(दि.२८) अखेरचा श्वास घेतला. चार जणांनी केलेल्या पाशवी बलात्कारानंतर या मुलीचा कमरेपासून खालचा भाग पूर्णतः निकामी झाला होता. नराधमांनी केलेल्या सामुहिक अत्याचारामुळे पीडितेला शारिरीक वेदनेसह प्रचंड मानसिक धक्का बसला होता. या धक्क्यातून तिला सावरता आले नाही. अत्याचारामुळे झालेल्या रक्तस्त्रावाने तिची प्रकृती अधिक नाजूक अवस्थेत गेली होती.
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रहिवासी १९ वर्षीय पीडिता मुंबईत भावाकडे राहण्यास आली होती. मैत्रिणीच्या वाढदिवसाला म्हणून ७ जुलै रोजी ती घराबाहेर पडली. त्याच दिवशी चेंबूरच्या लाल डोंगर भागात तिच्यावर चौघांनी बलात्कार केला. मात्र, घरी आल्यानंतर घाबरलेल्या पीडितेने कोणालाच काही सांगितलं नाही. वेदना सहन करत ती तशीच झोपून राहिली. दोन दिवसानंतर तिचे पाय लुळे पडू लागले. हातापायातून थरकाप होऊ लागला. हा प्रकार अर्धांगवायूचा समजून तिला गावी पाठवण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार झाले. मात्र प्रकृतीत सुधारणा झाली नसल्यामुळे तिला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तेथील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले तेव्हा तिच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. डॉक्टरांनी विश्वासात घेऊन वस्तुस्थिती विचारल्यानंतर पीडितेने घडलेली घटना सांगितली. चार जणांनी काहीतरी पाजून आपल्यावर बलात्कार केल्याचं तिने सांगितलं. डॉक्टरांनी ही बाब तिच्या आई-वडिलांना सांगितली. त्यानंतर तिच्या वडिलांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. हाच गुन्हा मुंबईतील चुनाभट्टी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. नराधमांनी केलेल्या सामुहिक अत्याचारामुळे पीडितेला शारिरीक वेदनेसह प्रचंड मानसिक धक्का बसला होता. या धक्क्यातून तिला सावरता आले नाही. अत्याचारामुळे झालेल्या रक्तस्त्रावाने तिची प्रकृती अधिक नाजूक अवस्थेत गेली होती. गेल्या महिन्याभरापासून या पिडीतेवर उपचार सुरू होते. डॉक्टरांनी तिला वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती, पण २५ जुलैपासून सुरू असलेल्या उपचारांना पीडितेचे शरीर प्रतिसाद देत नव्हते. डॉक्टरांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांनाही यश आले नाही आणि मरणयातना भोगून या तरुणीने अखेर बुधवारी जगाचा निरोप घेतला. पण अद्याप आरोपींना पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आलेलं नाही.
