पुसद येथे युवकाचा चाकूने खून

येथील बसस्थानक परिसरात गुरुवारी रात्री तिघांनी शेख आसिफ शेख हानिफ (२७) रा.पार्वतीनगर याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच चाकूने भोसकले. यात शेख आसिफ ठार झाला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली.
शेख आसिफ शेख हानिफ याच्यावर गुरुवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास शेख अलताफ शेख सलाम (२५), शेख सादिक शेख सलाम (१९) आणि शेख इम्रान शेख नवाब (२०) सर्व रा. कानडे ले-आऊट यांनी जुन्या भांडणातून हल्ला केला. तिघांनीही शेख आसिफला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. शेख अलताफ याने चाकूने पोटावर वार केले. या मारहाणीत शेख आसिफचा मृत्यू झाला. या प्रकरणी शेख सलीम शेख मुसा (२७) रा.दुधे ले-आऊट याने वसंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.
या घटनेनंतर गुरुवारी रात्री व शुक्रवारी सकाळी शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. शहरचे ठाणेदार प्रमेश आत्राम यांनी या प्रकरणाची सूत्रे स्वत:कडे घेऊन आरोपींचा शोध सुरू केला. तिन्ही आरोपींना रात्रीच अटक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *