मोलमजुरी करून कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या पती-पत्नीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तिवसा तालुक्यातील वऱ्हा येथे उघडकीस आली आहे. नरेश श्रीराम मलकाम (४०) आणि पूजा नरेश मलकाम (३२) अशी मृतांची नावे आहेत. मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास दोघांनी आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण लगेच कळू शकले नाही, तथापि गरिबीला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
नरेश व पूजाने घरी दोन वेगवेगळे दोर बांधून एकाचवेळी आत्महत्या केली. शेजाऱ्यांना ही माहिती कळताच पोलिसांना सूचना देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतले. नरेश व पूजा यांना ओम (५) आणि जान्हवी (७) ही दोन अपत्ये आहेत. दोघांच्या आत्महत्येने मुले पोरकी झाली आहेत. मलकाम कुटुंबीय चांदूर रेल्वे तालुक्यातील कारला येथून सात वर्षांपूर्वी वऱ्हा येथे वास्तव्यासाठी आले होते. दोघेही शेतमजुरीचे काम करून उदरनिर्वाह करीत होते. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. गेल्या अनेक दिवसांपासून चिंताग्रस्त असलेल्या नरेश व पूजाने काल रात्री आपली जीवनयात्रा संपवली. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.
