भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे निधन झाल्याने दुखवटा असताना पिंपरी-चिंचवडचे भाजपचे महापौर राहुल जाधव यांनी मात्र बुधवारी भलताच ‘उद्योग’ केल्याचे दिसून आले. पवना धरणात जलपूजनाचे निमित्त करून त्यांनी एकप्रकारे वर्षांविहाराचे आयोजन केले होते. श्रावण महिना असतानाही तिथे दारूसह मटण, मासे अशी व्यवस्था होती. एवढे कमी म्हणून की काय, महापौरांनी स्वत:च्या पिस्तूलामधून हवेत गोळीबार करत दोन राऊंड फायर केल्याने उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच बसला.
पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण पूर्णपणे भरले असून, त्याचे औचित्य साधून महापौरांनी ५५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पवना धरणाजवळ जाऊन जलपूजन करण्याचा निर्णय घेतला. विरोधी पक्षनेते नाना काटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख मकरंद निकम यांच्यासह काही अधिकारी, पालिकेचे कर्मचारी आणि पत्रकार असा ५० जणांचा लवाजमा घेऊन महापौर सकाळीच जलपूजनासाठी रवाना झाले. महापौरांनी तेथे सपत्निक जलपूजन केले. त्याची व्यवस्थित छायाचित्रे (फोटोसेशन) काढून घेतली.
त्यानंतर, पवनेविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या मुलाखती दिल्या. ८३ दिवस पाणीकपातीला सामोरे जावे लागले. यापुढे दररोज पाणीपुरवठा करण्यात येईल. वर्षांनुवर्षे शहरवासीयांची तहान भागवणारे पवना धरण पूर्णपणे भरल्याने जलपूजन केले, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्यानंतर सर्वासाठी जेवणाची व्यवस्था होती. श्रावण असतानाही मांसाहाराचा समावेश होता. काहींच्या मद्यप्राशनाची आवर्जून व्यवस्था होती. सरते शेवटी महापौरांनी मोटारीत असलेले स्वत:चे नवे पिस्तूल मागवले. त्यात सर्वासमोर गोळ्या भरल्या आणि त्यातून दोन गोळ्या हवेत झाडल्या. गोळ्या झाडण्याच्या आवाजामुळे उपस्थित सर्वानाच धक्का बसला. महापौरांनी अशाप्रकारे गोळीबार का केला, याचे कोडे कोणालाच उलगडले नाही.
पावसामुळे शहर पाण्यात आहे. जवळपास सात हजार नागरिक पुराच्या पाण्यामुळे स्थलांतरित आहेत. सुषमा स्वराज यांचे निधन झाल्याने भाजप परिवारात दुखवटा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनादेश यात्रेला अल्पविराम देऊन दुष्काळाचा आढावा घेतला. पालिकेतही स्थायी समितीची बैठक सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहून तहकूब करण्यात आली.
अशी परिस्थिती आजूबाजूला असतानाही महापौरांनी जलपूजनाच्या नावाखाली वर्षांविहार घडवून आणला. त्यातील मद्य आणि मांसाहार टीकेचा विषय ठरलाच. त्याहून महापौरांनी केलेला गोळीबार हा सर्वात कळस ठरला आहे.
पवना धरणाच्या जलपूजनाच्या कार्यक्रमात कोणतेही चुकीचे काम झालेले नाही. जेवणात बटाटा भाजी, पनीर, चपाती, भात असा मेनू होता. दारूचा विषयच नव्हता. गोळीबार वगैरे काही करण्यात आलेला नाही. कोणीही काहीही सांगत सुटेल. त्याला काही अर्थ नाही.
