पाकिस्तानातून परत आणलेल्या गीताला अश्रू अनावर

 गीता या पाकिस्तानातून परत आणण्यात आलेल्या ‘हरवलेल्या’ मुलीसाठी माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या मातेसमान होत्या, यात शंका नाही. २०१५ मध्ये तिला पाकिस्तानातून भारतात परत आणण्यासाठी सुषमा स्वराज यांनी अथक प्रयत्न केले होते. सुषमा यांच्या निधनाने गीताचा अश्रूंचा बांध फुटला नसता तरच नवल. तिने सांकेतिक भाषेत सांगितले, की सुषमा नेहमी माझी ख्यालीखुशाली विचारत असत.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये  तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी गीताचे वर्णन ‘हिंदूुस्थान की बेटी’ असे केले होते. गीताला तिचे कुटुंबीय भेटले नाहीत तरी तिला पाकिस्तानमध्ये परत पाठवणार नाही, भारत सरकार तिच्या पालनपोषणाची जबाबदारी घेईल, असे सुषमा यांनी म्हटले होते. गीता ऑक्टोबर २०१५ मध्ये पाकिस्तानातून भारतात परत आली तेव्हा ती विशीत होती. नंतरच्या काळात मध्य प्रदेशात इंदूर येथे मूकबधिरांच्या संस्थेत ती अभ्यास करीत राहिली.

वसतिगृहाचे अधिकारी संदीप पंडित यांनी सांगितले,की स्वराज यांच्या निधनाची बातमी गीताला बुधवारी सकाळी सांगण्यात आली. गीताला ते ऐकून रडू कोसळले. माझी माताच मला सोडून गेली अशा  भावना तिने सांकेतिक भाषेत व्यक्त केल्या. गीताची प्रगती तिच्याशी बोलून त्या वेळोवेळी जाणून घेत होत्या.

आठ वर्षांची असताना समझौता एक्स्प्रेसमधून लाहोरला गेलेली गीता तेथे हरवली होती. त्यानंतर ती तेथील एधी फाउंडेशनच्या वसतिगृहात रहात होती. २०१५ मध्ये तिला सुषमा स्वराज यांच्या प्रयत्नातून भारतात परत येण्याची संधी मिळाली. त्यानंतर ती दिल्ली व इंदूर येथे सुषमा यांना अनेकदा भेटली.

गीता परत आल्यानंतर ती आमचीच मुलगी आहे, असा दावा  भारतातील किमान दहा कुटुंबांनी केला होता. पण सरकारी तपासात कुणाचाच दावा खरा न ठरल्याने तिच्या कुटुंबीयांचा शोध जारी आहे. पण सुषमा यांच्या रूपाने तिला आईच्या मायेची पाखर  लाभली होती यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *