आठवडय़ाभरापासून कोसळत असलेला मुसळधार पाऊस आणि पात्राबाहेर वाहणाऱ्या नद्यांनी दक्षिण महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर शहर-जिल्ह्य़ांची अवस्था बुधवारी आणखी भीषण केली. या दोन्ही शहरांना सोमवारपासून बसलेला महापुराचा विळखा बुधवारी आणखी आवळला गेला.
हजारो बुडालेली घरे, पाण्याखाली गेलेले रस्ते-बाजारपेठा, ठप्प झालेले जनजीवन आणि मदतीसाठी सुरू असलेली विविध यंत्रणांची धडपड.. हेच विदारक चित्र या दोन्ही शहर- जिल्ह्य़ांमध्ये दिसत होते.
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्य़ांत आतापर्यंत १६ जणांचा बळी गेला आहे. पूरस्थितीमुळे बेघर झालेल्या दीड लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. कोल्हापूर, सातारा परिसरात अजूनही मुसळधार सुरू असल्याने परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती वर्तविली जात आहे. कृष्णा खोऱ्यातील पूरस्थितीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा अध्र्यावर सोडून तातडीने मुंबईत बुधवारी उच्चस्तरीय बैठकीत राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला.
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्य़ांत गेल्या आठवडाभरापासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या पश्चिम भागात पावसाचा विशेष जोर आहे. यामुळे या भागातील कोयना, चांदोली, राधानगरीसह महत्त्वाची सर्व धरणे अल्पावधीत शंभर टक्के भरून त्यातून होणाऱ्या विसर्गामुळे नद्यांना पूर आला आहे. यातीलच कृष्णा, वारणेमुळे सांगली, तर पंचगंगेमुळे कोल्हापूर शहराला सोमवारपासून महापुराचा विळखा बसला आहे.
कोल्हापूर जिल्ह्य़ातील महापुराची स्थिती बुधवारी तिसऱ्या दिवशी आणखी गंभीर झाली. पंचगंगा नदी बुधवारी धोकापातळीपेक्षा १३ फूट अधिक उंचीवरून वाहात असून अन्य नद्यांनी महापुराचा नवा विक्रम नोंदवला आहे.
या नद्यांचे पाणी कोल्हापूर शहराबरोबरच नदीकाठच्या शेकडो गावांमध्ये घुसले आहे. यामुळे हजारो घरे पाण्याखाली गेली आहेत. एनडीआरएफ, नौदल, लष्करासह स्थानिक तरुणांनी या भागात मदतकार्य सुरू केले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून आज पूरग्रस्त भागाची पाहणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या गुरुवारी पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्य़ातील सर्वच तालुक्यांत अतिवृष्टी झाली असून सांगली जिल्ह्य़ातील मिरज, वाळवा, शिराळा, पलूस या चार तालुक्यांना आणि सांगली शहर तसेच सातारा जिल्हय़ातील सातारा, कराड, पाटण, वाई या तालुक्यांना अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका बसला आहे.मुख्यमंत्री सकाळी विशेष विमानाने कोल्हापूरला जाणार असून यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.
