माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे निधन

देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे आकस्मिक निधन झाले आहे. त्या ६७ वर्षांच्या होत्या. सुषमा स्वराज यांच्या निधनाने एका मितभाषी आणि तितक्याच कणखर नेतृत्वाला देश मुकला आहे.

सुषमा यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पाच डॉक्टरांचं पथक त्यांच्यावर उपचार करत होतं. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्यात यश आलं नाही. तिथे सुषमा यांनी प्राणज्योत मालवली. सुषमा यांच्यासोबत त्यांचे पती व कुटुंबातील अन्य सदस्य होते. सुषमा बऱ्याच काळापासून आजारी होत्या. त्यांचं किडनी ट्रान्सप्लांटही झालं होतं.

सुषमा यांच्या निधनाचे वृत्त येताच राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह केंद्र सरकारमधील अनेक वरिष्ठ मंत्री तातडीने एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत.

या दिवसाची प्रतीक्षा होती!

सुषमा स्वराज सोशल मीडियावर फार सक्रिय होत्या. जम्मू-काश्मीरला कलम ३७० च्या जोखाडातून मुक्त करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल तसेच जम्मू-काश्मीरचं विभाजन करणारं विधेयक संसेदत मंजूर करून घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल सुषमा यांनी आज सायंकाळी साडेसात वाजता ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले होते. ‘मैं अपने जीवन में इस दिन को देखने की प्रतीक्षा कर रही थी’ अशा भावनाही सुषमा यांनी या ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या होत्या. या ट्विटनंतर काही तासांतच त्यांची प्राणज्योत मालवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *