अर्ध्या चिपळूण शहराला पुराचा फटका

मुसळधार पावसामुळे चिपळुणात पुन्हा पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या आठवड्यात दुसऱ्यांदा शहरात पाणी भरले असून मागील पुरापेक्षा या पुराची तीव्रता जास्त आहे. त्यामुळे सामान्य जनजीवनासह व्यापार, व्यवसायही कोलमडले आहेत. मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

शहरात पावसाचा जोर कायम असल्यामुळे रविवारी सकाळपासून सखल भागात पाणी भरले होते. अकरा वाजण्याच्या सुमारास वाशिष्ठीसह शिवनदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे बाजारपेठ, मच्छीमार्केट, मरकडी, काविळतळी, भोगाळे, बुरूमतळी, चिंचनाका, वडनाका, वेसमारुती मंदिर परिसरात पुराचे पाणी शिरले आहे. शहरात खेंड भागात चार दिवसापूर्वी दरड कोसळली होती. त्याच ठिकाणी सकाळी पुन्हा दरड कोसळली. दुपारी तीन वाजता बहादूर शेखनाका येथील पूल सांयकाळी वाहतूकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे मुंबई महामार्गावर लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

बुरूमतळी येथील मध्यवर्ती बस स्थानकात पाणी शिरल्याने एसटीचे सर्व नियोजन कोलमडले. मध्यवर्ती बसस्थानकातील सर्व वाहने शिवाजी नगर बसस्थानकाकडे वळविण्यात आली. तेथे मार्गदर्शन करण्यासाठी एसटीचे अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांनी गोंधळ घातला. अधिकाऱ्यांअभावी चालक, वाहकांनाही सूचना मिळाल्या नाही त्यामुळे तेही गोंधळेल्या अवस्थेत होते. प्रवाशांकडून होणारा संताप ते सहन करत होते.

या आधी गेल्या २६ आणि २७ जुलला शहरात पाणी भरले होते. तेव्हापासून पावसाचा जोर कायम असल्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांनी दुकानातील साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवले. त्यामुळे आजच्या पुरामध्ये व्यापाऱ्यांचे फार नुकसान झाले नाही. मात्र शहरात तीन ते पाच फूट पाणी होते. त्यामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे कोलमडले. पावसाचा जोर पाहून अनेकांनी दुकाने उघडलीच नाहीत.

राजापुरात यंदाच्या मोसमात सहाव्यांदा पूर

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे राजापूर तालुक्यातून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे यावर्षी सहाव्यांदा राजापुरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी रात्री शहरासह बाजारपेठेला वेढा घातलेल्या पुराच्या पाण्याने रविवारी जवाहर चौक पार करून थेट मशिदीच्या पायथ्याला सकाळी धडक दिली. पावसाचा जोर कायम असल्याने पुराचे पाणी अधिकच वाढत चालले आहे. त्यातून गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील नद्यांच्या काठावरील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *