सांताक्रूझच्या गोळीबार परिसरात रविवारी सकाळी विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरातील संतप्त रहिवाशांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. शनिवारी मध्यरात्रीपासून या परिसरातील घराघरांत पाणी शिरले होते. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून या परिसराचा विद्युतपुरवठा खंडित का केला नाही, हा सवाल जमावाने उपस्थित केला.
घरातील पाणी उपसण्याच्या प्रयत्नात असलेल्या माला नागम (५५) आणि त्यांचा मुलगा संकेत (२६) दोघांना विजेचा धक्का बसला. या घटनेने स्थानिक रहिवासी संतापले. परिसरात पाणी भरल्याने सुरक्षितता म्हणून येथील वीजप्रवाह खंडित करणे आवश्यक होते. मात्र उपाययोजना न केल्याने हा अपघात घडला, अशी भावना रहिवाशांमध्ये होती. दुपारी रहिवाशांनी गोळीबार परिसरात आंदोलन केले. निर्मलनगर पोलीस ठाण्यातील फौजफाटय़ासह उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. समजूत घालून जमावाला पांगविण्यात आले. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली. जमावाच्या आरोपांनुसार संबंधित यंत्रणांना चौकशीसाठी बोलावणे धाडले आहे. चौकशीनंतर कारवाई केली जाईल, असे सिंगे यांनी सांगितले.
रविवारी सकाळी ८ ते संध्याकाळी ६ या वेळेत शहरात शॉर्टसर्किटच्या एकूण १३ घटना घडल्या. ११४ ठिकाणी वृक्ष, फांद्या पडल्या. तर १४ ठिकाणी घर, घराची भिंत किंवा इमारतीचा भाग कोसळून अपघात घडले. मात्र यात कोणीही जखमी झालेले नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
